ENG vs SL 1st Test : जो रूटची लढाऊ खेळी, इंग्लंडचा श्रीलंकेवर पाच गडी राखून विजय….

England vs Sri Lanka 1st Test Highlights : इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत ऑली पोपच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाने पाच गडी राखून विजय मिळवला. पोपनेही आपल्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीची सुरुवात शानदार पद्धतीने केली आहे. बेन स्टोक्स दुखापतग्रस्त असल्याने त्याची इंग्लंडच्या कर्णधारपदी निवड झाली आहे.
यजमान इंग्लंडने श्रीलंकेवर अगदी सहज विजय मिळवला. संपूर्ण सामन्यात इंग्लिश संघ श्रीलंकेवर वर्चस्व गाजवत होता. इंग्लंडच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी घरच्या परिस्थितीचा चांगलाच फायदा घेत पाहुण्या श्रीलंकेचा पराभव केला. या सामन्यात इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जेमी स्मिथला त्याच्या 111 धावांच्या खेळीसाठी ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून निवडण्यात आले. इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेतील दुसरी कसोटी लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर 29 ऑगस्टपासून खेळवली जाणार आहे.
या सामन्यात धनंजय डी सिल्वाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो त्यांच्यासाठी चांगला ठरला नाही. श्रीलंका पहिल्या डावात 236 धावसंख्येपर्यतच मजल मारू शकली होती. प्रत्युत्तरात इंग्लंडने पहिल्या डावात 358 धावा करताना 122 धावांची आघाडी घेतली. यानंतर श्रीलंकेने दुसऱ्या डावात 326 धावा केल्या आणि इंग्लंडसमोर 205 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात श्रीलंकेच्या गोलंदाजांनी तीन मोठ्या विकेट्स घेत चांगली सुरुवात केली होती, पण जो रूटने हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथसह दोन महत्त्वपूर्ण भागीदारी करत चौथ्या दिवशी सामना संपवला. जो रुटने नाबाद 62 धावांची लढाऊ खेळी केली.
Sri Lanka made it a hard-fought contest, but England get over the line to go 1-0 up at Old Trafford!#ENGvSL scorecard: https://t.co/1E7nBMfnMe pic.twitter.com/LjWBzXGmCB
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) August 24, 2024
श्रीलंकेने पहिल्या डावात 236 धावा केल्या होत्या. संघासाठी कर्णधार धनंजयने सर्वाधिक 74 धावांचे योगदान दिले. याशिवाय मिलन रत्नायकेने 72 तर कुसल मेंडिसने 24, दिनेश चंडिमलने 17 धावांचे, कामिंदू मेंडिसने 12 धावांचे, विश्व फर्नांडोने 13 धावांचे आणि प्रभात जयसूर्याने 10 धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून ख्रिस वोक्स आणि शोएब बशीरने प्रत्येकी तीन, तर गस ऍटकिन्सनने दोन गडी बाद केले. मार्क वुडने एक विकेट घेतली. प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव 358 धावांवर संपला. जेमी स्मिथने सर्वाधिक 111 धावा केल्या होत्या. तर हॅरी ब्रूकने 56 आणि जो रूटने 42 धावांचे योगदान दिले. याव्यतिरिक्त डॅन लॉरेन्सने 30, वोक्सने 25 आणि ऍटकिन्सनने 20 तर वुडने 22 धावांची खेळी खेळली. श्रीलंकेकडून असिथा फर्नांडोने चार, प्रभात जयसूर्याने तीन आणि विश्व फर्नांडोने दोन बळी घेतले.
PAK vs BAN 1st Test : बांगलादेशचा ऐतिहासिक विजय, पाकला 10 विकेट्सने पराभूत करत रचला इतिहास…
श्रीलंकेने दुसऱ्या डावात 326 धावा केल्या होत्या. यामध्ये कामिंदू मेंडिसने 113, दिनेश चंडीमलने 79 धावाचे, अँजेलो मॅथ्यूजने 65 धावाचे तर दिमुथ करुणारत्नेने 27 योगदान दिले होते. इंग्लंडकडून वोक्स आणि मॅथ्यू पॉट्सने प्रत्येकी तीन बळी घेतले. त्याचवेळी ॲटकिन्सनला दोन विकेट मिळाल्या. रूट आणि वुडला प्रत्येकी एक विकेट मिळाली. प्रत्युत्तरात इंग्लंडने दुसऱ्या डावात पाच विकेट्सवर 205 धावा करून सहज सामना जिंकला. यादरम्यान, रुटने 128 चेंडूत सर्वाधिक 62 धावांची नाबाद खेळी खेळली. हॅरी ब्रूकने 32 , जेमी स्मिथने 39 तर डॅन लॉरेन्सने 34 धावाचे योगदान दिले. श्रीलंकेकडून दुसऱ्या डावत फर्नांडो आणि जयसूर्याने प्रत्येकी दोन गडी बाद केले. रत्नायकेने एक विकेट घेतली.





