ENG vs SL 1st Test : जो रूटचे विक्रमी अर्धशतक, राहुल द्रविड आणि ॲलन बॉर्डरला टाकले मागे…

ENG vs SL 1st Test : श्रीलंका क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या कालावधीत दोन्ही संघांमध्ये 3 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील पहिल्या कसोटीत इंग्लंडने श्रीलंकेचा 5 विकेट्सने पराभव केला. इंग्लंडचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू जो रूटने दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले. 128 चेंडूत 62 धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला.
यासह जो रूटने राहुल द्रविडचा खास विक्रम मोडला आहे. तो आता कसोटीत सर्वाधिक अर्धशतके करणारा तिसरा फलंदाज बनला आहे. एवढेच नाही तर जो रूटने ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज ॲलन बॉर्डर यांनाही मागे टाकले आहे. राहुल द्रविडने आपल्या कारकिर्दीत 164 कसोटी सामने खेळले. या काळात त्याने 286 डावांमध्ये 52.31 च्या सरासरीने आणि 42.51 च्या स्ट्राईक रेटने 13 हजार 288 धावा केल्या. तसेच त्याने कसोटीत 63 अर्धशतके झळकावली होती. त्याच्याशिवाय ॲलन बॉर्डर यांनीही कसोटीत 63 अर्धशतके झळकावली होती. आता जो रूटने दोन्ही दिग्गजांना मागे सोडले आहे.
रूटने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 144 कसोटी खेळल्या आहेत. या कालावधीत त्याने 263 डावांमध्ये 50.33 च्या सरासरीने आणि 56.70 च्या स्ट्राईक रेटने 12 हजार 131 धावा करताना कसोटीत 64 अर्धशतके झळकावली आहेत. याशिवाय त्याने क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये 32 शतके झळकावली आहेत.
सचिन तेंडुलकरचा विक्रम निशाण्यावर…
जो रूट कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने नवनवीन टप्पे गाठत आहे. तो लवकरच सचिन तेंडुलकरला मागे टाकू शकतो. यासाठी त्याला कसोटीत आणखी 5 अर्धशतके झळकावी लागतील.
सचिन तेंडुलकर : 68 अर्धशतक
शिवनारायण चंद्रपॉल : 66 अर्धशतक
जो रूट : 64 अर्धशतक
राहुल द्रविड : 63 अर्धशतक
ऍलन बॉर्डर : 63 अर्धशतक
रिकी पाँटिंग : 62 अर्धशतक
PAK vs BAN 1st Test : बांगलादेशचा ऐतिहासिक विजय, पाकला 10 विकेट्सने पराभूत करत रचला इतिहास…
याशिवाय जो रूट सध्या कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा 7वा खेळाडू असून तो लवकरच कुमार संगकारा आणि ॲलिस्टर कुक यांनाही मागे टाकू शकतो.
कसोटीत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज….
सचिन तेंडुलकर : 15,921धावा
रिकी पाँटिंग : 13,378 धावा
जॅक कॅलिस : 13,289 धावा
राहुल द्रविड : 13,288 धावा
ॲलिस्टर कुक : 12,472 धावा
कुमार संगकारा : 12,400 धावा
जो रूट : 12,131 धावा
ENG vs SL 1st Test : जो रूटची लढाऊ खेळी, इंग्लंडचा श्रीलंकेवर पाच गडी राखून विजय….
याबाबतीतही ठरला दुसरा फलंदाज….
इतकेच नाही तर रुट इंग्लंडसाठी चौथ्या डावात सर्वाधिक 50+ (50 पेक्षा अधिक) धावा करणारा दुसरा फलंदाज बनला आहे. माइक अथर्टन आणि ॲलिस्टर कुक यांनी चौथ्या डावात इंग्लंडसाठी सर्वाधिक 50+ धावा केल्या आहेत. दोघांनी 11-11 वेळा असे केले आहे. त्याच वेळी, रूट आणि ज्योफ बॉयकॉट यांनी 10-10 वेळा असे केले आहे. रुट मँचेस्टरच्या मैदानावर सर्वाधिक 50+ धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने आठ वेळा ही कामगिरी केली आहे, तर इंग्लंडच्या इयान बेल आणि डेनिस कॉम्प्टन यांनी प्रत्येकी सात वेळा ही कामगिरी केली आहे.





