#ICCWorldCup2019 : इंग्लंडच्या संघात आर्चरचा समावेश

जो डेण्टली, ऍलेक्‍स हेल्स आणि डेव्हिड विली यांना डच्चू

लंडन – इंग्लंडच्या संघाने विश्‍वचषक स्पर्धेला अवघे काही दिवस बाकी असताना संघात तीन महत्वपुर्ण बदल केले असुन त्यांनी विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी खेळणाऱ्या अंतिम संघात जोफ्रा आर्चर याला संधी दिली आहे. तत्पूर्वी, इंग्लंडने 15 सदस्यीय प्राथमिक संघ जाहीर केला होता. त्यात अष्टपैलू खेळाडू जोफ्रा आर्चरला स्थान देण्यात आले नव्हते. मात्र, नुकत्याच झालेल्या आयर्लंड व पाकिस्तानविरुद्धच्या मालिकांमध्ये त्याला संधी देण्यात आली होती. त्या मालिकांमधील चांगल्या कामगिरीच्या जोरावर आर्चरला संधी मिळाली. त्याच्याबरोबरच लिअम डॉसन आणि जेम्स विन्स या दोघांनाही संधी देण्यात आली आहे.

बार्बाडोसमध्ये जन्मलेल्या 24 वर्षीय आर्चरकडे एकाही आंतरराष्ट्रीय सामन्याचा अनुभव नव्हता. परंतु ससेक्‍सचे प्रतिनिधित्व करताना त्याने आपल्या कामगिरीची छाप पाडली. तीन वर्षे देशांतर्गत क्रिकेट हा इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाचा पात्रतेचा निकष आहे. तो त्याने मार्च 2017 मध्येच पूर्ण केला. त्यामुळे विश्‍वचषकाचा संघ निश्‍चित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) 23 मे पर्यंत दिलेली मुदत ही त्याच्यासाठी पर्वणी होती. त्याने मधल्या कालावधीत उत्तम कामगिरी करत संघात स्थान पटकावले. या संघात आधी असलेल्या खेळाडूंपैकी जो डेण्टली, ऍलेक्‍स हेल्स आणि डेव्हिड विली यांना डच्चू देण्यात आला आहे.

इंग्लंडचा विश्वचषकासाठी 15 खेळाडूंचा अंतिम संघ :

ईऑन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, जॉस बटलर, टॉम करन, लियाम डॉसन, लियाम प्लंकेट, आदिल रशीद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्‍स, जेम्स विन्स, ख्रिस वोक्‍स, मार्क वूड.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)