Ben Stokes Retires : क्रिकेट विश्वात खळबळ! बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली तडकाफडकी निवृत्ती
Ben Stokes Retires : अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे.

Ben Stokes Retires From International Cricket : इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार आणि आधुनिक क्रिकेटमधील महान अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध ट्रेंट ब्रिज येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी म्हणजेच रविवारी, २८ जून रोजी स्टोक्सने हा धक्कादायक निर्णय घेतला. विशेष म्हणजे, ज्या वेळी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) सोशल मीडियावर त्याच्या निवृत्तीची अधिकृत माहिती प्रसिद्ध केली, तेव्हा स्टोक्स मैदानावर गोलंदाजी करत होता.
निवृत्तीची घोषणा झाली अन् पुढच्याच चेंडूवर घेतली विकेट –
कसोटीच्या चौथ्या दिवशी न्यूझीलंडच्या ७ विकेट्स पडल्यानंतर डॅरिल मिचेल आणि जॅक फोक्स यांनी खेळपट्टीवर चिवट फलंदाजी सुरू केली होती. सामन्याच्या ८१ व्या षटकादरम्यान अचानक स्टोक्सच्या निवृत्तीची अधिकृत घोषणा झाली, ज्यामुळे संपूर्ण स्टेडियमसह समालोचकही अवाक् झाले.
नेहमीच नाट्यमय आणि थरारक खेळासाठी ओळखल्या जाणाऱ्या स्टोक्सने पुढच्याच षटकात चेंडू हातात घेतला. संपूर्ण प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्याचा उत्साह वाढवला आणि स्टोक्सने या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जॅक फोक्सला बाद करत ही जोडी फोडली. विकेट मिळवताच स्टोक्सने मैदानावर आनंदाने धाव घेतली आणि संपूर्ण संघ त्याच्या मागे धावला.
Ben, for 𝗲𝘃𝗲𝗿𝘆𝘁𝗵𝗶𝗻𝗴 – thank you 🙏 pic.twitter.com/fld0wFJpxl
— England Cricket (@englandcricket) June 28, 2026
नाईटक्लब वाद आणि निवृत्तीची पार्श्वभूमी –
One of England’s all-time greatest captains, Ben Stokes, has decided to retire from international cricket at the end of this Test match.
Ben, you have been the most inspirational captain, leader and legend this team could have ever hoped for.
We love you so much and wish you… pic.twitter.com/U5grq0F0kj
— England Cricket (@englandcricket) June 28, 2026
स्टोक्सने हा निर्णय चौथ्या दिवशी खेळ सुरू होण्यापूर्वीच ड्रेसिंग रूममध्ये आपल्या सहकाऱ्यांना सांगितला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीनंतर तो एका नाईटक्लब वादामध्ये अडकला होता, ज्यामुळे तो दुसऱ्या कसोटीत खेळू शकला नव्हता. जरी तपासात तो निर्दोष सुटला आणि तिसऱ्या कसोटीत परतला, तरी त्याच्या कारकिर्दीबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर त्याने या शेवटच्या सामन्यासह आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सांगता केली.
अशी राहिली बेन स्टोक्सची वादळी कारकीर्द –
२०११ मध्ये पदार्पण करणाऱ्या बेन स्टोक्सने इंग्लंडला २०१९ चा वनडे वर्ल्ड कप आणि २०२२ चा टी-२० वर्ल्ड कप जिंकवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. त्याने आपल्या कारकिर्दीत १२२ कसोटी सामन्यांत ७,२२८ धावा केल्या आणि २५१ विकेट्स घेतल्या. कसोटीत सर्वाधिक १३६ षटकार मारण्याचा जागतिक विक्रमही त्याच्याच नावावर आहे. तो जॅक कॅलिसनंतर ७००० धावा आणि २५० विकेट्सची दुहेरी कामगिरी करणारा जगातील केवळ दुसरा खेळाडू आहे. याशिवाय, ११४ वनडे सामन्यांत ३,४६३ धावा आणि ७४ विकेट्स, तर ४३ टी-२० सामन्यांत ५८५ धावा आणि २६ विकेट्स त्याच्या नावावर नोंदवल्या गेल्या आहेत.





