Road Safety World Series | भारताचा 6 धावांनी पराभव

नवी दिल्ली – रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज स्पर्धेतील सामन्यात इंग्लंड संघाने भारताचा 6 धावांनी पराभव केला. या सामन्यात इंग्लंडकडून केविन पीटरसनने 37 चेंडूत 75 धावा केल्या. त्याने 5 चौकार व 6 षटकार फटकावले. त्याच्या या वादळी खेळीने इंग्लंडने 20 षटकात 188 धावा केल्या.
विजयासाठी 189 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग व युवराज सिंग हे लवकर बाद झाले. त्यानंतर इरफान पठाणने 34 चेंडूत नाबाद 61 धावांची वादळी खेळी केली मात्र, तरीही भारतीय संघाला पराभव टाळता
आला नाही.
पठाणने 4 चौकार व 5 षटकार फटकावले. मनप्रीत गोनीने 16 चेंडूत नाबाद 35 धावा केल्या. भारतीय संघाला अखेरच्या 2 चेंडूत 8 धावांची गरज होती. मात्र, त्यांना केवळ दोनच धावा करता आल्या.
स्पर्धेत भारतीय संघाने याआधीच्या सलग तीन सामन्यात विजय मिळवला होता. इंग्लंडविरुद्ध मात्र त्यांचा पराभव झाला. पठाणने गोलंदाजीतही चमकदार कामगिरी केली. त्याने चार षटकांत 28 धावात दोन गडी बाद केले.





