अभियांत्रिकीतील ‘टाॅपर’ बनला चोर; ४ लाख ७४ हजार रुपयांचे दागिने लांबवून कर्नाटकात पसार

पुणे – सराफी पेढीतून चार लाख ७४ हजार रुपयांचे दागिने लांबवून कर्नाटकात पसार झालेल्या एका तरुणाला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी अभियांत्रिकी महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थी असल्याची माहिती तपासात मिळाली आहे. आर्थिक चणचणीमुळे त्याने दागिने चोरल्याचे तपासात उघडकीस आले.
या प्रकरणात अटक करण्यात आलेला १९ वर्षीय तरुण मूळचा कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील अरनहळ्ळी गावातील रहिवासी आहे. बाजीराव रस्त्यावर एक सराफी पेढी आहे. एक ग्रॅम वजनाच्या दागिने विक्रीसाठी (फाॅर्मिंग ज्वेलरी) ही सराफी पेढी प्रसिद्ध आहे.
पेढीच्या वरच्या मजल्यावरील प्रसाधनगृहाच्या खिडकीतून आत प्रवेश करून त्याने चार लाख ७४ हजारांचे दागिने लांबविले होते. दुसऱ्या दिवशी चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पेढीच्या मालकाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर आणि तपास पथकाने २५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले. तांत्रिक तपासात पसार झालेला चोरटा कर्नाटकात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक कर्नाटकात रवाना झाले.
चार दिवस पोलिसांचे पथक त्याच्यावर पाळत ठेवून होते. १६ जुलै रोजी त्याला कोलार परिसरातील गांधीनगर भागात सापळा लावून पकडले. चौकशीत त्याने आर्थिक अडचणीमुळे गुन्हा केल्याची कबुली दिली. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त हृषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर, पाेलीस कर्मचारी आशिष खरात, राहुल मोरे, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे आदींनी तपास केला.





