जात पडताळणी प्रमाणपत्र मिळत नसल्याने अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा संताप

पुणे – अभियांत्रिकी प्रवेशासाठी पहिली यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी आज (दि.7) शेवटचा दिवस आहे. मात्र अर्ज करून शेवटच्या दिवशीही विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळत नसल्याचे दिसून येत आहे. या कार्यालयाकडून वेळेत प्रमाणपत्र मिळत नसल्याने प्रवेशाची संधी हुकणार आहे, अशी व्यथा मांडत विद्यार्थ्यांनी येरवडा येथील जात पडताळणी कार्यालयसमोर मांडली.
अभियांत्रिकी पदवी प्रवेशासाठी पहिली प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर झाली. त्यानुसार सर्व प्रमाणपत्र सादर करीत प्रवेश निश्चित करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. त्यात जात वैधता प्रमाणपत्र असल्याशिवाय प्रवेश होणार नाही, हे यापूर्वीच जाहीर करण्यात आले. त्यासाठी विद्यार्थी जात पडताळणी कार्यालयात गर्दी केली. मात्र या कार्यालयाकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचे विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. प्रमाणपत्र मिळत नसल्याने आता आयुष्यातील अभियांत्रिकी प्रवेशाची संधी मिळणार नाही, असे सांगत काही विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले होते.





