ENG vs SCO : ‘करो या मरो’च्या सामन्यात इंग्लंडचा स्कॉटलंडवर दणदणीत विजय; टॉम बँटन ठरला तारणहार, सुपर-८ च्या आशा जिवंत
ENG vs SCO : टी-२० विश्वचषक २०२६ मधील गट 'क' मधील अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात इंग्लंडने स्कॉटलंडचा ५ गडी राखून पराभव केला आहे.

ENG vs SCO England win against Scotland T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषक २०२६ मधील गट ‘क’ मधील अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात इंग्लंडने स्कॉटलंडचा ५ गडी राखून पराभव केला आहे. कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर रंगलेल्या या लढतीत विजय मिळवत इंग्लंडने सुपर-८ मधील आपले स्थान भक्कम केले आहे. दुसरीकडे, या पराभवामुळे स्कॉटलंडच्या पुढील फेरीच्या आशांना मोठा धक्का बसला आहे.
स्कॉटलंडचा डाव १५२ धावांवर आटोपला –
नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडची सुरुवात समाधानकारक झाली, मात्र इंग्लंडच्या अचूक माऱ्यासमोर त्यांचा डाव २० षटके पूर्ण होण्याआधीच १५२ धावांवर आटोपला. स्कॉटलंडचा कर्णधार रिची बेरिंगटनने सर्वाधिक ४९ धावा केल्या, तर माईकल जोन्सने ३३ धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून फिरकीपटू आदिल रशीदने ३ विकेट्स घेतल्या. जोफ्रा आर्चर आणि लियाम डॉसन यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद करत स्कॉटलंडला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले.
टॉम बँटन ठरला इंग्लंडचा तारणहार –
प्रत्युत्तरात १५३ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात अतिशय खराब झाली होती. सलामीवीर जोस बटलर आणि फिल सॉल्ट केवळ १३ धावांत तंबूत परतले. अशा कठीण परिस्थितीत टॉम बँटन इंग्लंडचा तारणहार ठरला. बँटनने ४१ चेंडूंत ४ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ६३ धावांची मॅचविनिंग खेळी साकारली. त्याला जॅकब बेथेल (३२) आणि सॅम करन (२८) यांनी चांगली साथ दिली. ज्यामुळे इंग्लंडने १८.२ षटकांत ५ गडी गमावून हे लक्ष्य गाठले.
Back-to-Back Blow!
Archer’s Magic Leaves Scotland Stunned#engvssco #ICCMensT20WorldCup #CricketTwitter #jofraarcher
📸jiohotstar pic.twitter.com/lg4bQTj8Y5
— CricInformer (@CricInformer) February 14, 2026
युरोपीय संघांविरुद्धचा ‘दुष्काळ’ संपला –
या सामन्यापूर्वी इंग्लंडचा टी-२० विश्वचषकात युरोपीय देशांविरुद्धचा रेकॉर्ड अत्यंत खराब होता (५ सामने, ० विजय). मात्र, आजच्या विजयाने इंग्लंडने हा नकोसा विक्रम पुसून टाकला आहे. नेपाळविरुद्धचा निसटता विजय आणि वेस्ट इंडिजकडून मिळालेला पराभव यानंतर हॅरी ब्रूकच्या नेतृत्वाखालील इंग्लंडला अखेर आपली लय सापडली आहे.
गुणतालिकेतील समीकरणं बदलली –
या विजयापूर्वी स्कॉटलंड चांगल्या नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर होते, तर इंग्लंड चौथ्या स्थानावर संघर्ष करत होते. मात्र, आता इंग्लंडने महत्त्वपूर्ण २ गुण मिळवून ‘सुपर-8’च्या शर्यतीत जोरदार पुनरागमन केले आहे. ईडन गार्डन्सच्या संथ खेळपट्टीवर स्कॉटलंडच्या फिरकीपटूंनी (मार्क वॅट) कडवी झुंज दिली, पण बँटनच्या अनुभवापुढे त्यांची डाळ शिजली नाही.






