ENG vs SA : इंग्लंडविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेला ICC चा दणका, ठोठावला मोठा दंड

South Africa Fined for Slow Over Rate : दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाला इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे मॅच फीच्या ५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. एमिरेट्स आयसीसी एलिट पॅनल ऑफ मॅच रेफरी जवागल श्रीनाथ यांनी ही कारवाई केली. दक्षिण आफ्रिका निर्धारित वेळेत एक ओव्हर कमी फेकण्यात दोषी आढळला. मैदानी पंच नितीन मेनन आणि रसेल वॉरेन, तिसरे पंच शरफुद्दौला इब्ने शाहिद आणि चौथे पंच माइक बर्न्स यांनी हा आरोप लावला होता.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नियमांनुसार, खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठीच्या आचारसंहितेच्या कलम २.२२ अंतर्गत, न्यूनतम ओव्हर गतीच्या उल्लंघनासाठी प्रत्येक कमी फेकलेल्या ओव्हरसाठी खेळाडूंना मॅच फीच्या ५ टक्के दंड आकारला जातो. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याने अपराध आणि प्रस्तावित दंड स्वीकारला, त्यामुळे औपचारिक सुनावणीची गरज पडली नाही.
इंग्लंडचा ऐतिहासिक विजय –
जेकब बेथेल (११०) आणि जो रूट (१००) यांच्या शानदार शतकांनंतर जोफ्रा आर्चर (४ विकेट्स) आणि आदिल रशीद (३ विकेट्स) यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने रविवारी तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ३४२ धावांनी पराभव केला. हा वनडे इतिहासातील धावांच्या फरकाने सर्वात मोठी विजय आहे. परंतु, दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली.
दक्षिण आफ्रिकेची सुरुवात अत्यंत खराब –
४१५ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात अत्यंत खराब झाली. अवघ्या २४ धावांत त्यांनी सहा गडी गमावले. जोफ्रा आर्चरने एडेन मार्करम (०), रायन रिकल्टन (१), मॅथ्यू ब्रिटझके (४) आणि ट्रिस्टन स्टब्स (१०) यांना बाद केले. ब्रायडन कार्सने वियान मुल्डर (०) आणि डेवाल्ड ब्रेव्हिस (६) यांना बाद केले. संकटकाळात कॉर्बिन बॉश आणि केशव महाराज यांनी पारी सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु १५व्या षटकात आदिल रशीदने केशव महाराज (१७) याला बाद केले.
त्यानंतर कोडी युसूफ (५) आणि कॉर्बिन बॉश (२०) हेही रशीदचे बळी ठरले. इंग्लंडच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला २०.५ षटकांत ७२ धावांत गुंडाळून सामना ३४२ धावांनी जिंकला.जोफ्रा आर्चरला त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी ‘प्लेयर ऑफ द मॅच’ आणि मालिकेत १७५ धावा करणाऱ्या जो रूटला ‘प्लेयर ऑफ द सीरिज’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.





