#ENGvsPAK । इंग्लंडने कोरलं टी-२० विश्वचषकावर नाव, पाकिस्तानला ५ गडी राखून धूळ चारली

ENG vs PAK – इंग्लंडने दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला आहे. मेलबर्नच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंडच्या गोलंदाजांनी पाकिस्तानला कमी धावसंख्येवर रोखण्यात यश मिळवले. यानंतर अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने सावध फलंदाजी करत इंग्लंडला टी-२० विश्वचषकाचा विजेता बनवलं.
वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान ग्लेन मॅक्सवेलचा अपघात, ऑस्ट्रेलिया क्रिकेटसाठी धक्कादायक बातमी!
सामन्यात पाकिस्तानने दिलेल्या १३८ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लडची सुरुवात खराब झाली होती. भारताविरुद्ध हिरो ठरलेला अॅलेक्स हेल्स १ धाव करून तंबूत परतला. मात्र दुसऱ्या बाजूने जोस बटलरने २६ धावांची खेळी करत संघाला सावरले. यानंतर ठराविक अंतराने गडी बाद होण्यास सुरुवात झाली आणि इंग्लंड संघावर दबाव निर्माण झाला. मात्र अष्टपैलू बेन स्टोक्सने सावध खेळी करत अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडला विजय मिळवून दिला. त्याने ४९ चेंडूत ५२ धावांची नाबाद अर्धशतकीय खेळी केली. त्याचबरोबर हॅरी ब्रूक्स २० आणि मोईन अलीने १९ धावांचे योगदान दिले. पाकिस्तानकडून गोलंदाजीत हॅरिस रौफने सर्वाधिक २ तर शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम आणि शादाब खान यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
नाणेफेक हरल्यानंतर पाकिस्तान संघाने फलंदाजीत सलामीवीरांनी अत्यंत कासवगतीने धावा केल्या. मोहम्मद रिझवानने १४ चेंडूत १५ तर बाबर आझम २८ चेंडूत ३२ धावा केल्या. यानंतर शान मसूद ३८ धावा आणि शादाब खानने २० धावा केल्या. याव्यतिरिक्त कोणत्याही पाकिस्तानी फलंदाजाला धावा करता आल्या नाही. इंग्लंडकडून गोलंदाजीत सॅम करनने सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर आदिल रशीद आणि ख्रिस जॉर्डन यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले. बेन स्टोक्सने अष्टपैलू कामगिरी करत १ गडी बाद केला.
WHAT A WIN! 🎉
England are the new #T20WorldCup champions! 🤩#PAKvENG | #T20WorldCupFinal | 📝 https://t.co/HdpneOINqo pic.twitter.com/qK3WPai1Ck
— ICC (@ICC) November 13, 2022
इंग्लंडने १९९२ च्या विश्वचषकात पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचा बदला घेतला आहे. १९९२ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर इंग्लंडचा पराभव केला होता. आता ३० वर्षांनंतर इंग्लंडने मेलबर्नमध्येच पाकिस्तानचा पराभव केला आहे. इंग्लंड दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकाचा चॅम्पियन बनला आहे. याआधी इंग्लंड २०१० मध्येही टी-२० विश्वचषकाचा विजेता बनला होता. तेव्हा पॉल कॉलिंगवूड हा इंग्लंड संघाचा कर्णधार होता.





