ENG vs AUS 4th ODI : इंग्लंडविरूध्द ऑस्ट्रेलियाचा लाजिरवाणा पराभव, मालिकेतही साधली २-२ ने बरोबरी…

लंडन- हॅरी ब्रुक, बेन डकेट व लियाम लिव्हिंगस्टोन यांनी केलेली दमदार अर्धशतकी खेळी आणि मॅथ्यू पॉट्स व ब्रायडॉन कार्स यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंड संघाने ऑस्ट्रेलियाला तब्बल १८६ धावांनी पराभूत करताना ५ सामान्यांच्या एकदिवसीय मालिकेत २-२ अशी बरोबरी केली.
पावसामुळे लढत प्रत्येकी ३९ षटकांची करण्यात आली होती. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने निर्धारित ३९ षटकांत ५ बाद ३१२ अशी धावसंख्या उभारली. यामध्ये कर्णधार हॅरी ब्रुकने तडाखेबंद ८७ धावांची खेळी करताना ११ चौकार व १ षटकार लगावला. सलामीवीर बेन डकेटने ६ चौकार व १ षटकाराच्या साहाय्याने ६३ धावांची खेळी केली.
जेमी स्मिथ ३९ धावा करून बाद झाल्यानंतर आलेल्या लियाम लिव्हिंगस्टोनने केवळ २७ चेंडूत ३ चौकार व ७ षटकार मारताना ६२ धावांची खेळी केली. लिव्हिंगस्टोनच्या खेळीने इंग्लंड संघाला ३०० धावांचा टप्पा पार करता आला. ऍडम झॅम्पाने २ तर ग्लेन मॅक्सवेल, मिचेल मार्श व जोश हेजलवूड यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
इंग्लंडने उभारलेल्या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाचा डाव २४.४ षटकांत सर्व बाद १२६ धावांत संपुष्टात आला. सलामीवीर ट्रेव्हिस हेड ३४ व मिचेल मार्शने २८ धावा करताना ६८ धावांची सलामी दिली. दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाचा डाव मॅथ्यू पॉट्स व ब्रायडॉन कार्सच्या भेदक गोलंदाजीसमोर गडगडला.
मॅथ्यू पॉट्सने ३८ धावांच्या मोबदल्यात, ब्रायडॉन कार्सने ३६ धावांच्या मोबदल्यात ३ गडी बाद केले. ऍलेक्स कॅरीने १३ धावा करताना लढत देण्याचा प्रयत्न केला. ज़ोफ्रा आर्चरने २, आदिल रशीदने १ गडी बाद करून संघाला विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक :-
इंग्लंड : ३९ षटकांत ५ बाद ३१२ : हॅरी ब्रुक ८७ (११ चौकार, १ षटकार), बेन डकेट ६३ (६ चौकार, १ षटकार), लियाम लिव्हिंगस्टोन ६२ (३ चौकार, ७ षटकार), जेमी स्मिथ ३९ (१ चौकार, २ षटकार), ऍडम झॅम्पा ८-६६-२, ग्लेन मॅक्सवेल ३-३०-१, मिचेल मार्श ४-२७-१, जोश हेजलवूड ८-१-४०-१.
ऑस्ट्रेलिया : २४.४ षटकांत सर्व बाद १२६ : ट्रेव्हिस हेड ३४ (४ चौकर, २ षटकार), मिचेल मार्श २८ (२ चौकार, १ षटकार), ऍलेक्स कॅरी १३, मॅथ्यू पॉट्स ८-२-३८-४, ब्रायडॉन कार्स ६-०-३६-३, ज़ोफ्रा आर्चर ७-०-३३-२, आदिल रशीद ३.४-०-११-१.




