AUS vs ENG 2nd ODI : इंग्लंडवरील सलग दुसऱ्या विजयासह ऑस्ट्रेलियाच्या नावावर झाली एका मोठ्या विक्रमाची नोंद…

Australia Most Consecutive Win In ODI : ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा 68 धावांनी पराभव केला. अशा प्रकारे 5 वनडे मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाने 2-0 ने आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाचा संघ 44.4 षटकांत सर्वबाद 270 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात इंग्लंड 40.2 षटकात 202 धावसंख्येपर्यंत मजल मारू शकला. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाने 68 धावांनी मोठा विजय मिळवला. यासोबतच ऑस्ट्रेलियाच्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. वास्तविक, ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पराभव केला आणि सलग 14 एकदिवसीय सामने जिंकले आहेत.
‘या’ संघांनी जिंकले आहेत सलग सर्वाधिक एकदिवसीय सामने
गेल्या एका वर्षात ऑस्ट्रेलियाने सलग 14 एकदिवसीय सामने जिंकले. त्याचबरोबर सलग सर्वाधिक एकदिवसीय सामने जिंकण्याचा विक्रमही ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. साल 2003 मध्ये ऑस्ट्रेलियाने सलग 21 एकदिवसीय सामने जिंकले होते. त्याचबरोबर या यादीत श्रीलंका तिसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेने 2023 मध्ये सलग 13 एकदिवसीय सामने जिंकले होते. यानंतर दक्षिण आफ्रिका चौथ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 2005 मध्ये सलग 12 एकदिवसीय सामने जिंकले होते. त्यानंतर, सलग 12 एकदिवसीय सामने जिंकण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर आहे.
14 ODI wins in a row for Australia with another ruthless performance to down England in the second ODI! #ENGvAUS pic.twitter.com/uI1UJU8YHy
— cricket.com.au (@cricketcomau) September 21, 2024
ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा केला मोठ्या फरकाने पराभव….
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या वनडेबद्दल बोललो तर, प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेला ऑस्ट्रेलियन संघ 44.4 षटकात 270 धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून ॲलेक्स कॅरीने 67 चेंडूत सर्वाधिक 74 धावा केल्या. याशिवाय मिचेल मार्शने 59 चेंडूत 60 धावा केल्या. इंग्लंडकडून बेर्डन कॉर्सने सर्वाधिक 3 बळी घेतले. याशिवाय मॅथ्यू पॉट्स, आदिल रशीद आणि जेकब बेथेलला 2-2 यश मिळाले तर ऑली स्टोनने 1 बळी घेतला.
ऑस्ट्रेलियाच्या 270 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा संपूर्ण संघ 40.2 षटकात 202 धावांवर गारद झाला. इंग्लंडकडून जेमी स्मिथने सर्वाधिक 49 धावा केल्या. मात्र ते योगदान विजय मिळवण्यासाठी अपुरे पडले. तर सलामीवीर बेन डकेट याने 32 तर फिलिप सॉल्ट याने 12 धावांचं योगदान दिलं. कर्णधार हॅरी ब्रूक केवळ 4 धावांवर माघारी परतला. विल जॅक्स आणि लियाम लिविंगस्टोन या दोघांना खातंही उघडता आलं नाही. आस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. जोश हेझलवूड, आरोन हार्डी आणि ग्लेन मॅक्सवेल या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या तर एडम झॅम्पा याने 1 विकेट घेतली.





