पुणे | बंडगार्डन रोडवरील अतिक्रमणे जमीनदोस्त

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – केंद्र सरकारची जागा मालकी असलेल्या आणि राज्य सरकार कस्टोडियन ऑफ इव्यक प्रॉपर्टीज असल्याने जमाबंदी आयुक्तांच्या आदेशावरून गुरुवारी बंडगार्डन रोडवरील प्रसिद्ध मोबोज हॉटेल परिसरातील १३३ अतिक्रमणे आज (गुरुवारी) महसूल विभागाने जमीनदोस्त केली. मोठा पोलीस बंदोबस्त आणि महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.
पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील व उपविभागीय अधिकारी स्नेहल किसवे- देवकाते, व्यवस्थापक संचित मालमत्ता तथा तहसीलदार पुणे शहर सूर्यकांत येवले, नायब तहसीलदार शंकर ठुबे यांच्यासह अतिक्रमण विभाग आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
मोबोज हॉटेल हा परिसर बंडगार्डन रस्त्यावर अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे. या जमिनीची मालकी केंद्र सरकारची असून, सध्याच्या मिळकतीचे मालक हे महाराष्ट्र शासन कस्टोडियन ऑफ ईव्यक ऑफ प्रॉपर्टीज आहेत. या मालमत्तेचे व्यवस्थापकीय अधिकारी म्हणून पुणे शहर तहसीलदार यांची नियुक्ती आहे.
असे असताना या मालमत्तेमध्ये काही जणांनी हक्क असल्याचा दावा करून 30 डिसेंबर 2018 पासून कंटेनर आणून ठेवले होते. यासंदर्भात महसूल विभागाकडे तक्रार केली होती. याप्रकरणी मंडल अधिकारी पुणे शहर यांनी पाहणी केली असता सदर मिळकतीवर कंटेनर, तसेच एकूण 133 अधिक अतिक्रमणे दिसून आली.
ही अतिक्रमणे साधारणतः 20 ते 25 वर्षांपासून असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावून वेळोवेळी पत्रव्यवहारही केला होता. येत्या दोन- तीन दिवसांत पुन्हा उर्वरित कारवाई केली जाणार असल्याचे तहसीलदार यांनी सांगितले.





