Nagar : नेवासा फाटा येथील वाहतूक कोंडीला अतिक्रमणच जबाबदार

नेवासा : अहिल्यानगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नेवासा फाटा येथील आंबेडकर चौक आणि राजमुद्रा चौकात सततच वाहतुकीचा बोजवारा उडालेला आहे. वारंवार वाहतूक कोंडी होत असल्यामुळे वाहनधारकांसह व्यापाऱ्यांना या वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करण्याची वेळ आलेली आहे.
ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दिवसभर वाहतूक पोलिसांचे मोठे हाल होत असून, या कोंडीतून रुग्णवाहिका आणि पोलिसांचे वाहनेही सुटले जात नाहीत. याचे मुख्य कारण महामार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण कारणीभूत असताना याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. येथे दिवसभर वाहतूक कोंडी आणि या कोंडीतून वाहनाच्या हॉर्नचा कर्णकर्कश आवाजामुळे व्यापाऱ्यांची डोकेदु:खी होत आहे. याकोंडीतून सुटका करण्यासाठी नेवासा फाटा येथील अतिक्रमण काढण्याची नितांत गरज आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीच याकडे आता लक्ष घालण्याची मागणी जनतेतून केली जात आहे.
नेवासा फाटा येथे महामार्गाच्या रस्त्याच्या दुतर्फा मोठे अतिक्रमण करण्यात आलेले असल्यामुळे ही वाहतूक कोंडीची समस्या वारंवार होत आहे. वाहतूक शाखेचे पोलीस दिवसभर वाहतूक नियंत्रण करताना दिसून येत असले तरी एका चौकातील कोंडी सुटली की, दुसऱ्या चौकात वाहतूक कोंडी होत असल्यामुळे यामध्ये प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. जागतिक बँक प्रकल्प विभागाने याची दखल घेऊन वाहतूक कोंडीचा कायमस्वरुपी प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण काढून टाकण्याची गरज आहे.





