Encroachment: दुकानांचे नामफलक काढू नका
Encroachment:

अतिक्रमण कारवाईबाबत महापालिका अधिकाऱ्यांना निर्देश
फ्रंट आणि साइड मार्जिनमधील अतिक्रमणे हटवा
Encroachment: पुणे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेदरम्यान दुकानांवरचे अधिकृत नामफलक काढण्यात येऊ नयेत, असे स्पष्ट निर्देश महापालिका प्रशासनाने दिले आहेत.
रस्त्यावरील आणि फुटपाथवरील अतिक्रमणांसह फ्रंट मार्जिन अणि साइड मार्जिनमधील अनधिकृत अतिक्रमणांवरच नियमानुसार कारवाई करावी, असे आदेश परवाना आणि आकाशचिन्ह विभागाकडून काढण्यात आले आहेत. सभागृह नेते गणेश बिडकर यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्तांकडे दुकानदारांचे नामफलक काढू नयेत, अशी मागणी केली होती.
शहरात मोठ्या प्रमाणावर संयुक्त अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान काही ठिकाणी प्रत्यक्ष अतिक्रमण हटविण्याऐवजी दुकानांचे नामफलक काढण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याची दखल घेत आता अतिक्रमण कारवाई करताना दुकानांचे नामफलक काढण्यात येऊ नयेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
संबंधित दुकानांच्या फ्रंट मार्जिन आणि साइड मार्जिनमध्ये असलेले अनधिकृत अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करावी, तसेच दुकानांच्या भिंतीवरील नामफलक काढण्याची कारवाई करू नये, असे निर्देश सर्व संबंधित सहाय्यक आयुक्त, अतिक्रमण निरीक्षक, आकाशचिन्ह निरीक्षक आणि कारवाई पथकातील कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.
फुटपाथवरील किंवा फुटपाथलगत असलेले अनधिकृत साइन बोर्ड आणि इतर अतिक्रमणांवर मात्र नियमानुसार कारवाई करावी, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले असून, उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेण्यास संबंधितांना सांगण्यात आले आहे.





