लघुउद्योग उभारणीसाठी प्रोत्साहन देणार – डॉ. अतुल भोसले

कराड -येणारा काळ तरूणांसाठी कसोटीचा राहणार आहे. अशावेळी तरूणांनी लघुउद्योगाची उभारणी करून स्वयंरोजगार निर्माण करण्याची गरज आहे. यासाठी कराड तालुक्यात स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या तरूणांना लघूउद्योग उभारणीसाठी कृष्णा सहकारी बॅंकेच्या माध्यमातून आर्थिक प्रोत्साहन देणार असल्याची माहिती कृष्णा बॅंकेचे चेअरमन तथा भाजपाचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले यांनी केले.
लॉकडाऊन आणि त्यानंतरची परिस्थिती या विषयावर डॉ. भोसले यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. डॉ. भोसले म्हणाले, लॉकडाऊन काळातील अडचणी सोडविण्यासाठी सरकारने शर्थीचे प्रयत्न केले आहेत. विशेषत: असंघटीत क्षेत्रातील कामगारांच्या प्रश्नांकडे विशेष लक्ष देत गरीब, कष्टकरी लोकांना डोळ्यांसमोर ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटींचे विशेष पॅकेज जाहीर केले आहे. याचा लाभ समाजातील सर्व घटकांना होणार आहे.
करोना काळात जोखीम पत्करून लोकांच्या सेवेसाठी झटत असलेले डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, पोलीस, ग्रामपंचायती, नगरपालिका अशा सर्वांच्याच कार्याला सलाम आहे. दरम्यान, योग्य उपचाराने करोनामुक्त होता येत असल्याने घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र, आपल्याला योग्य ती प्रतिबंधात्मक काळजी घेण्याची गरज आहे. तसेच काही लक्षणे आढळल्यास तातडीने कोणतीही भीड न बाळगता कृष्णा हॉस्पिटल किंवा अन्य कोव्हिड केअर केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले.





