जम्मू – जम्मू-काश्मीरमधील उधमपूरमधील बसंतगड भागात बुधवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. मिळालेल्या माहितीनुसार, जैश-ए-मोहम्मद (JeM) या दहशतवादी संघटनेचे 4 सशस्त्र दहशतवादी परिसरात लपून बसले होते. सुरक्षा दलांनी त्यांना घेरले आहे. या चकमकीत सुरक्षा दलांनी 2 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती मिळत आहे. काही वेळापूर्वी या प्रकरणाची माहिती देताना संरक्षण प्रवक्त्याने सांगितले होते की, विशेष गुप्त माहितीच्या आधारे कठुआमध्ये संयुक्त शोध मोहीम सुरू करण्यात आली आणि कठुआ-बसंतगड सीमेवर दहशतवाद्यांना घेरण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून दोन्ही बाजूंनी काही गोळीबार करण्यात येत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हल्ल्याची योजना – जम्मू-काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर विधानसभा निवडणुका होत आहेत, निवडणुकांमुळे दहशतवादी कारवायांमध्ये अचानक वाढ झाली आहे. येथे 3 टप्प्यात निवडणूक होणार आहे, पहिला टप्पा 18 सप्टेंबरला, दुसरा टप्पा 25 सप्टेंबरला आणि तिसरा टप्पा 1 ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे गुप्तचर यंत्रणांना राज्यातील अनेक भागात दहशतवादी हालचालींची माहिती मिळाली, त्यात जम्मू-काश्मीर निवडणुका आणि कैलास कुंड यात्रेवर हल्ला होण्याची शक्यता आहे. दहशतवादी सुरक्षा दल आणि पोलिसांच्या स्थानांवरही हल्ला करू शकतात, असेही सांगण्यात आले. जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटना – जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेची स्थापना 2000 साली पाकिस्तानमध्ये झाली होती. मौलाना मसूद अझहरने भारतात दहशतवाद पसरवण्याच्या उद्देशाने ही संघटना तयार केली होती. या संघटनेवर भारत सरकारने बंदी घातली आहे. प्रतिबंधित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद 2019 च्या पुलवामा बॉम्बस्फोटासह देशातील अनेक प्राणघातक हल्ल्यांसाठी जबाबदार आहे.