Pimpri : वर्षभरात शहरातील 1,204 युवकांना नोकरी

पिंपरी : कौशल्यम उपक्रमा अंतर्गत, 2024-25 या वर्षात पिंपरी चिंचवड क्षेत्रातील 1204 युवकांना नोकरी मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली गेली आहे. हे युवक आता त्यांच्या आवडत्या क्षेत्रात करियर करत असून, आर्थिकदृष्ट्या सक्षम बनले आहेत, अशी माहिती उपायुक्त अण्णा बोदाडे यांनी देत, महापालिकेच्या औद्योगिक क्षेत्रातील महत्व अधोरेखित करत, रोजगार मेळाव्याचा लाभ घेत आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले.
पिंपरी चिंचवड महापालिका, लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन व पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी स्मार्ट सारथी यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून 1200 हून अधिक युवकांनी नोंदणी केली.
अनेक युवकांनी या संधीचा लाभ घेत विविध कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून आर्थिक स्थैर्याचा मार्ग स्वीकारला आहे. या नोकरी मेळाव्याचे उद्घाटन महापालिकेचे उपायुक्त अण्णा बोदाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी स्मार्ट सिटी कंपनी सेक्रेटरी चित्रा पणवार, लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशनच्या मुख्य कार्यक्रम अधिकारी अमृता बहुलेकर, कौशल्य प्रकल्प प्रमुख समीर शेख व ग्लोबल ऑपॉर्च्युनिटी युथ नेटवर्कचे सुब्रत नायक आदी उपस्थित होते. यावेळी समीर शेख, अमृता बहुलेकर व सुब्रत नायक यांनी युवकांना मार्गदर्शन केले.
आणखी 4 ठिकाणी सुरू होणार लाईट हाऊस
पिंपरी चिंचवड क्षेत्रातील 11 ठिकाणी लाईट हाऊस कौशल्य विकास आणि रोजगार केंद्र स्थापन करण्यात आले आहे. हे केंद्र पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, बोपखेल, बोर्हाडेवाडी, दापोडी, नेहरूनगर, आकुर्डी, किवळे, आणि चिखली या भागांत कार्यरत आहेत. लवकरच अजून 4 ठिकाणी अशा स्वरूपाची केंद्रे सुरू होणार आहेत.
लाईटहाऊस केंद्राची माहिती
लाईटहाऊस मध्ये नाव नोंदणी केल्यावर, प्रत्येक विद्यार्थ्याला फाउंडेशन कोर्स उपलब्ध आहे. हा कोर्स सर्वांसाठी मोफत असून, याचा कालावधी 22 दिवसांचा आहे. या कोर्स मध्ये विद्यार्थ्यांना डिजिटल ट्रेनिंग दिले जाते, त्यांना इंग्रजी संभाषणाचे प्रशिक्षण मिळते. मुलाखतीची तयारी करून घेतली जाते, यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास तर वाढतोच
नोकरीपूरक कोर्स
काही कोर्सेस पूर्णपणे मोफत असतात तर काही कोर्सेसला नाममात्र शुल्क आकारले जात आहे. कॉम्पुटर ऑपरेटर, हेल्थ, जिम इन्स्ट्रकटर, नर्सिंग सहायक, ग्राफिक डिझाइन, सॉफ्टवेअर लँग्वेजेस हे व इतर अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत. नोकरीला लागण्यापूर्वीचे ट्रेनिंग, रिझ्युमे तयार करणे, मुलाखतीची तयारी करून घेणे आणि मुलाखतीच्या संपूर्ण प्रक्रियामध्ये प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक सहाय्य करणे हे या टप्प्यावरील महत्वाचे मुद्दे आहेत.





