Diwali Bonus News | दिवाळीच्या निमित्त काही कंपन्यामार्फत बोनस, व्हाउचर, गिफ्ट दिले जातात. मात्र कंपन्यांनी दिवाळीला पुरेसा बोनस न दिल्यास काही कंपन्यांमधील कर्मचारी नाराज होत असल्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. असाच एक प्रकार आता उत्तर प्रदेशामध्ये घडला आहे. फतेहाबादमधील एका टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस कमी मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला. कर्मचाऱ्यांनी त्यांच्या व्यवस्थापनाकडे दिवाळी बोनस मागितला तेव्हा व्यवस्थापनाने त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे टोल कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी कंपनीवर नाराजी व्यक्त करत टोल प्लाझाचं गेट ओपन ठेवलं. त्यामुळे ऐन दिवाळीत हजारो वाहने टोल टॅक्स न भरताच पुढे निघून गेले. याचा चांगलाच आर्थिक फटका टोल कंपनीला बसला आहे. यात कंपनीचे तब्बल २५ ते ३० लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा दावा केला जात आहे. तब्बल दोन तास टोल वसुली थांबली होती. ही घटना आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवरील फतेहाबादमध्ये घडली आहे. Diwali Bonus News | कर्मचाऱ्यांचा आरोप काय? फतेहाबाद टोल प्लाझाची जबाबदारी या वर्षी मार्चपासून श्री साई अँड दातार कंपनीकडे आहे. या टोल प्लाझावर 21 कर्मचारी तैनात आहेत. कंपनीने दिवाळीला प्रत्येक कर्मचाऱ्याला बोनस दिला. परंतु कर्मचाऱ्यांनी गेल्या वेळी त्यांना 5000 रुपये बोनस मिळाल्याचा दावा केला होता. त्यामुळे यावर्षीही मागच्या वर्षीप्रमाणे बोनस हवा असल्याचं म्हणणं कर्मचाऱ्यांचं होतं. परंतु कंपनीने अलीकडेच कंत्राट घेतल्याचा दावा केल्याने पूर्ण वर्षाचा बोनस का द्यायचा, असं सांगितलं. कर्मचाऱ्यांना ते पटले नसल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी शनिवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास टोल नाका उघडला, ज्यामुळे टोल वसुली तात्पुरती थांबली. या प्रकरानंतर व्यवस्थापन आणि प्रशासकीय अधिकारी परिस्थिती हाताळण्यासाठी आले. कर्मचाऱ्यांना दोन तास समजावून सांगण्यात आलं आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना १० टक्के पगारवाढ देऊ केली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेत टोल प्लाझावर पुन्हा काम सुरू केलं. Diwali Bonus News | हेही वाचा: काऊंटडाऊन सुरु ; मुहूर्त ट्रेडिंग दरम्यान ‘या’ स्टॉकवर लक्ष्मीची होणार कृपा