Nagar | आरटीओ कार्यालयातील कर्मचारी बेमुदत संपावर

नगर, (प्रतिनिधी) – अनेक वर्षाच्या आपल्या प्रलंबित विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) कर्मचाऱ्यांचे ६६ वर्ष नेतृत्व करणाऱ्या मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेने मंगळवारपासून (दि.२४) बेमुदत संप सुरु केला आहे. त्यामुळे नगरमधील दैनंदिन कार्यालयीन कामकाज झाले पूर्णपणे ठप्प झाले आहे.
आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांना प्रशासकीय कामकाजाबरोबर वाहन चालक, मालक हे ग्राहक सेवेचे काम करावे लागते. यामुळे प्रशासकीय कामात गुंतागुंत निर्माण झाली आहे. या दुहेरी कामांच्या बोजामुळे कर्मचारी त्रस्त आहेत.
महसुली विभागीय बदल्यांचे धोरण रद्द करण्यात आले नाही. विभागीय परीक्षांमध्ये अनावश्यक बदल करण्यात आले आहेत. आकृतीबंधाची योग्य अंमलबजावणी केली जात नाही.
कर्मचाऱ्यांच्या हिताच्या कळसकर समितीच्या तरतुदींची अंमलबजावणी न करणे, बदल्या, बढत्यांमध्ये सेवा ज्येष्ठतेचा विचार न करणे.
या कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत. मोटार वाहन कर्मचारी संघटनेने वेळोवेळी या मागण्यांविषयी शासनाकडे दाद मागितली आहे.
त्याची दखल शासनाने घेतली नाही. केवळ तोंडदेखली आश्वासने देऊन कर्मचाऱ्यांची वेळोवेळी बोळवण करण्यात आली. त्यामुळे यावेळी लेखी स्वरुपात मागण्या मान्य झाल्याचे पत्र परिवहन विभागाकडून दिले जात नाही, तोपर्यंत बेमुदत बंद मागे घेतला जाणार नाही, असा पवित्रा संघटनेने घेतला आहे.
या संपामुळे दैनंदिन कार्यालयीन कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. संप सुरु राहिल्यास वाहनांशी संबंधित कामे रखडणार आहेत.
याबाबत वरिष्ठ कार्यालयास माहिती देण्यात आली आहे. वरिष्ठ स्तरावर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरु आहे. विनोद सगरे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, नगर.





