Pune District : भोर बसस्थानकात घाणीचे साम्राज्य; स्वच्छता अधिभाराच्या नावाखाली प्रवाशांची लूट?
Pune District : बसस्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या स्वच्छतागृहातील नळ तुटले आहेत. पाण्याचा वापर होत नसल्याने आतील बाजूस घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

महुडे : भोर येथील बस स्थानकात सध्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. बसस्थानक परिसरात स्वच्छतागृहांची दुरवस्था आणि पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्याने येथे राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेसची मोठी वर्दळ असते. दररोज शेकडो प्रवासी येथून ये-जा करतात. मात्र, मूलभूत सुविधांच्या अभावामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
बसस्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या स्वच्छतागृहातील नळ तुटले आहेत. पाण्याचा वापर होत नसल्याने आतील बाजूस घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे प्रवासी उघड्यावर लघुशंका करत असून, याचा महिला व तरुणींच्या सुरक्षिततेवर परिणाम होत आहे. बसस्थानकासमोरील पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या परिसरात मोठी झाडे-झुडपे वाढली आहेत.
पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे दिवसरात्र पाणी वाया जात आहे. परिणामी, चिखल आणि दलदल निर्माण झाल्याने प्रवाशांना पाणी पिण्यासाठी झाडाझुडपातून वाट काढावी लागत आहे. बसस्थानक परिसरात अस्वच्छता आणि दुर्लक्षामुळे भिकाऱ्यांनी या जागेला आपला निवारा बनवले आहे.
सध्या प्रवाशांच्या प्रत्येक तिकिटावर दोन रुपये ‘स्वच्छता अधिभार’ आकारला जातो. हा अधिभार प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी आणि आगार परिसरात स्वच्छता राखण्यासाठी आहे. असे असतानाही सुविधांचा अभाव असल्याने, ‘आम्ही भरलेला स्वच्छता अधिभार जातो कुठे?’ असा संतप्त सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
काय आहे स्वच्छता अधिभार?
सध्या प्रवाशांच्या प्रत्येक तिकिटावर २ रुपये स्वच्छता अधिभार आकारला जातो. बसस्थानक आणि आगार परिसरात स्वच्छता राखणे, तसेच प्रवाशांना दर्जेदार सुविधा पुरवणे हा या कराचा मूळ उद्देश आहे.





