नवी दिल्ली – झायडस कॅडिलाच्या झायकोव्ही-डी या तीन डोसच्या कोविड-19 विरोधी लसीला आपत्कालिन वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे. तशी मान्यता देण्यात यावी अशी शिफारस केंद्रीय कोविड-19 विरोधी तज्ञांच्या पॅनेलने केली आहे.
“सेंट्रल ड्रग स्टॅन्डर्ड कंट्रोल ऑर्गनायजेशन’च्या कोविड-19 विषयक तज्ञांच्या पॅनेलने झायडस कॅडिलाच्या अर्जावर त्वरित निर्णय घेऊन या लसीला मान्यता देण्याची शिफारस देशाच्या औषध नियंत्रक महानियंत्रकांकडे केली होती. त्यानुसार ही मान्य देण्यात आली. त्यामुळे 12 वर्षांच्या पुढील सगळ्यांना आता ही स्वदेशी लस दिली जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अहमदाबादेतील झायडस कॅडिला या औषध कंपनीने या लसीला आपत्कालिन वापराची मंजूरी मिळण्याबाबत 1 जुलै रोजी अर्ज केला होता. या लसीच्या देशात 50 पेक्षा अधिक केंद्रांवर सर्वात जास्त चाचण्या घेण्यात आल्या आहेत, असे कंपनीने म्हटले आहे.
या लसीला मान्यता मिळाल्यामुळे कोविड-19 विरोधातील डिएनए लस म्हणून झायकोव्ही-डी ही भारतीय कंपनीने विकसित केलेली जगातील पहिली लस ठरणार आहे. भारतात मान्यता मिळालेली ही सहावी लस आहे. आता सीरम इन्स्टिट्युटची कोविशील्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन, रशियाची स्पुटनिक-व्ही आणि अमेरिकेतील मॉडर्ना आणि जॉन्सन ऍन्ड जॉन्सन या लसींना यापूर्वीच मान्यता दिली गेली आहे.
झायकोव्ही-डी ही लस सुई शिवाय दिली जाणारी लस आहे. या लसीचा प्रौढांबरोबर 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांनाही उपयोग होईल, असे कॅडिला हेल्थकेअरचे व्यवस्थापकीय संचालक शर्विल पटेल यांनी सांगितले.