एलॉन मस्कने वर्षभरात 15 लाख कोटी रुपये गमावले; गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली नोंद

वॉशिंग्टन – 2022 या वर्षाने अनेकांना नुकसानाचा तडाखा दिला असला तरी जगातील आघाडीचा उद्योगपती एलोन मस्क यांनी याबाबत एका विक्रमाची नोंद केली आहे. 2022 या एका वर्षात मस्क यांना तब्बल 182 अब्ज डॉलर्स म्हणजेच 15 लाख कोटी रुपयांचा तोटा झाला असून हा तोटा विक्रमी असल्याने त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. मस्क यांनी 2022 मध्ये जेवढा तोटा सहन केला त्यापेक्षा कमी आकाराची अर्थव्यवस्था कतार या देशाची आहे.
कतार या देशाचे वार्षिक राष्ट्रीय उत्पादन 176 अब्ज डॉलर आहे पण मस्क यांना मात्र 182 अब्ज डॉलरचा तोटा झाला आहे. 2022 या वर्षात जगभरातील पाच प्रमुख अब्जाधीश यांनी एकूण 35 लाख कोटी रुपये गमावले आहेत. त्यामध्ये मस्कच्या खालोखाल जेफ बेजोस यांचा नंबर आहे. या वर्षांमध्ये त्यांनी सात लाख कोटी रुपये गमावले आहेत. त्यानंतर मार्क झुकरबर्ग ने 6.3 लाख कोटी ,लॅरी पेज यांनी 3.7 लाख कोटी आणि सरगाई ब्रिन यांनी 3.6 लाख कोटी रुपये गमावले आहेत.
2021 मध्ये मस्क यांची संपत्ती 328 अब्ज डॉलर होती ती आता 138 अब्ज डॉलर्स वर येऊन पोहोचली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात संपत्ती गमावल्याने मस्क यांचा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती हा बहुमानही कट झाला आहे. ते आता दुसऱ्या स्थानावर पोहोचले असून एलव्हीएचएम या लक्झरी ब्रांडचे चेअरमन बर्नार्ड अरनोट आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत.
हजार 2022 या वर्षांमध्ये ट्विटर अधिग्रहण करण्याच्या झालेल्या गोंधळामुळे आणि टेसला या कंपनीच्या शेअर्समध्ये चढ-उतार झाल्याने मस्क यांना हा तोटा लागला आहे. 2022 या वर्षांमध्ये टेसला कंपनीच्या शेअर्सच्या किमतीमध्ये तब्बल 70 टक्के घट झाली होती. ट्विटरची खरेदी करण्यासाठी मस्क यांनी टेसलातील आपले शेअर विकण्यास प्रारंभ केल्याने त्याचा फटका कंपनीला बसला आणि मस्क यांच्या संपत्तीमध्येही घसरण झाली.





