Australian Open 2026 : महिला दुहेरीत मर्टेन्स-झांग जोडीचा ‘ग्रँड’ धमाका! ३७ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन जोडीने मिश्र दुहेरीत रचला इतिहास
Australian Open 2026 : अनुभवी एलिस मर्टेन्स आणि झांग शुआई या जोडीने आपल्या उत्कृष्ट समन्वयाच्या जोरावर महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे.

Australian Open 2026 Final Result : ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ च्या महिला दुहेरी (Women’s Doubles) आणि मिश्र दुहेरी (Mixed Doubles) स्पर्धांचे निकाल स्पष्ट झाले आहेत. अनुभवी एलिस मर्टेन्स आणि झांग शुआई या जोडीने आपल्या उत्कृष्ट समन्वयाच्या जोरावर महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे. दुसरीकडे, यजमान ऑस्ट्रेलियन जोडीने मिश्र दुहेरीत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे.
महिला दुहेरी: ४-१ ने पिछाडीवर असतानाही दमदार कमबॅक
चौथी मानांकित जोडी असलेल्या बेल्जियमच्या एलिस मर्टेन्स आणि चीनच्या झांग शुआई यांनी अंतिम सामन्यात ॲना डॅनिलिना आणि अलेक्झांड्रा क्रुनिक या जोडीचा ७-६(४), ६-४ असा पराभव केला. पहिल्या सेटमध्ये मर्टेन्स-झांग जोडी ४-१ ने पिछाडीवर होती, मात्र त्यांनी जिद्दीने खेळत हा सेट टायब्रेकरमध्ये जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये या जोडीने ५-० अशी मोठी आघाडी घेतली होती. डॅनिलिना-क्रुनिक जोडीने दोन चॅम्पियनशिप पॉईंट्स वाचवून पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण मर्टेन्स आणि झांग यांनी विजय खेचून आणला.
DREAM TEAM 🌟
Six Grand Slam titles for Mertens🇧🇪
Three for Zhang 🇨🇳
Their first together 🤝Champions in Melbourne 🏆 pic.twitter.com/4iQhxVvGz3
— #AusOpen (@AustralianOpen) January 31, 2026
२०२२ च्या विम्बल्डननंतर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र खेळत होती. मर्टेन्सचे हे सहावे ग्रँड स्लॅम दुहेरी जेतेपद आहे, तर झांगचे हे तिसरे जेतेपद ठरले आहे. मर्टेन्स आता पुन्हा एकदा जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी झेप घेण्यास सज्ज झाली आहे.
एलिस मर्टेन्स झांग शुआईने ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले
मिश्र दुहेरी: ३७ वर्षांनंतर ‘बॅक-टू-बॅक’ विजेतेपद –
मिश्र दुहेरीत ऑस्ट्रेलियाच्या ओलिव्हिया गॅडेकी आणि जॉन पीयर्स या जोडीने इतिहास रचला आहे. ही जोडी सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद राखणारी ३७ वर्षांतील पहिली जोडी ठरली आहे. १९८८-८९ मध्ये जाना नोव्होत्ना आणि जिम पुघ यांनी असा पराक्रम केला होता, त्यानंतर गॅडेकी-पीयर्स जोडीने ही किमया करून दाखवली आहे.
हेही वाचा – Elena Rybakina : ऑस्ट्रेलियन ओपनला मिळाली नवी टेनिस सम्राज्ञी! एलिनाने सबालेंकाचं ‘हॅट्ट्रिक’चं स्वप्न मिळवलं धुळीस
पुरुष दुहेरीतही यजमान ऑस्ट्रेलियाला आशा –
पुरुष दुहेरीतही यजमान ऑस्ट्रेलियाला आशा आहेत. होमटाऊन वाइल्डकार्ड जोडी जेसन कुबलर आणि मार्क पोलमॅन्स अंतिम फेरीत विजेतेपदासाठी मैदानात उतरणार आहेत.





