Elena Rybakina Winner : देश बदलला अन् नशीब फळफळले! एलेना रायबाकिनाने जिंकले यूएस ओपनचे जेतेपद, सबालेन्काला चारली धूळ
Elena Rybakina Winner : सलग तिसऱ्यांदा यूएस ओपन जिंकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरलेल्या सबालेन्काविरुद्ध रायबाकिनाने पहिल्यापासूनच आक्रमक खेळ दाखवला.

Elena Rybakina Wins US Open 2026 Women Singles Title Record Prize Money : रशियात जन्मलेल्या आणि अवघ्या १९ व्या वर्षी कझाकस्तानचे नागरिकत्व स्वीकारणाऱ्या एलेना रायबाकिनाने (Elena Rybakina) टेनिस विश्वात नवा इतिहास रचला आहे. २७ वर्षीय रायबाकिनाने वर्षातील अखेरची ग्रँड स्लॅम स्पर्धा असलेल्या यूएस ओपन २०२६ (US Open 2026) च्या महिला एकेरीचे जेतेपद पटकावले. आर्थर अॅश स्टेडियमवर शनिवारी रात्री रंगलेल्या अंतिम सामन्यात तिने दोन वेळची गतविजेती आर्यना सबालेन्काला (Aryna Sabalenka) पराभवाचा धक्का देत तिसऱ्यांदा ग्रँड स्लॅम चषक उंचावला.
तीन सेटचा रोमहर्षक थरार; सबालेन्काची जेतेपदाची हॅटट्रिक रोखली!
सलग तिसऱ्यांदा यूएस ओपन जिंकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरलेल्या सबालेन्काविरुद्ध रायबाकिनाने पहिल्यापासूनच आक्रमक खेळ दाखवला. तिने पहिला सेट ६-४ अशा फरकाने जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये सबालेन्काने कडवी झुंज देत ७-५ ने बरोबरी साधली. मात्र, निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये रायबाकिनाने आपल्या वेगवान सर्व्हिस आणि अचूक फोरहँडच्या जोरावर सबालेन्काला कोणतीही संधी न देता ६-४, ५-७, ६-२ असा दिमाखदार विजय नोंदवला आणि पहिल्यांदाच यूएस ओपनवर आपले नाव कोरले.
नंबर-१ रँकिंगही हिसकावले; वर्षातील दुसरे ग्रँड स्लॅम नावावर –
TOP OF THE WORLD 🌎
Elena Rybakina defeats Sabalenka 6-4, 5-7, 6-2 to claim her first US Open title! pic.twitter.com/7XA520vTei
— US Open Tennis (@usopen) September 12, 2026
रायबाकिनाने अवघ्या चार दिवसांच्या अंतरात सबालेन्काला दुसरा मोठा धक्का दिला. अंतिम फेरीत पोहोचताच तिने सबालेन्काकडून जागतिक क्रमवारीत अव्वल (नंबर-१) स्थान हिसकावून घेतले होते. विशेष म्हणजे, २०२६ च्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यातही तिने सबालेंकाला तीन सेटमध्ये पराभूत करून ट्रॉफी उंचावली होती. एकाच वर्षात दोन ग्रँड स्लॅम फायनलमध्ये सबालेन्काला नमवून रायबाकिनाने महिला टेनिसमधील आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.
५३ कोटींचे विक्रमी बक्षीस; टेनिस इतिहासातील सर्वात मोठी रक्कम –
Sealed with a kiss 💋 pic.twitter.com/Awu53dRWEC
— US Open Tennis (@usopen) September 12, 2026
या ऐतिहासिक जेतेपदासह एलेना रायबाकिनावर पैशांचा पाऊस पडला आहे. तिला बक्षीस म्हणून ५५ लाख डॉलर्स (अंदाजे ५३ कोटी रुपये) मिळाले आहेत. यूएस ओपन आणि ग्रँड स्लॅमच्या संपूर्ण इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी बक्षीस रक्कम ठरली आहे. कझाकस्तानकडून खेळताना तिने मिळवलेले हे यश तिच्या टेनिस कारकिर्दीला एका नव्या शिखरावर घेऊन गेले आहे.





