Electronic Market: दसऱ्यापाठोपाठ दिवाळीतही इलेक्ट्रॉनिक मार्केट चमकणार!
Electronic Market:

मोबाइल, एसी, फ्रिज, एलईडी टीव्ही आदीसाठी विविध सवलती, खरेदी योजना जाहीर
दसऱ्यात चांगल्या प्रतिसादानंतर दिवाळीत बाजार चमकण्याची आशा
Electronic Market: दसऱ्यात मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर इलेक्ट्रॉनिक्स मार्केट ग्राहकांच्या दिवाळी स्वागतासाठी सज्ज झाले आहे. दसऱ्याच्या प्रतिसादानंतर दिवाळीतही चांगली उलाढाल होण्याची अपेक्षा विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.
दिवाळीत मोबाइल, एसी, फ्रिज आणि एलईडी टीव्हीच्या खरेदीला जोरदार मागणी असेल असे मत त्यांनी व्यक्त केली असून ग्राहकांसाठी विविध सवलतीही दिल्या आहेत.
भारतीय बाजारपेठेत सणासुदीच्या काळात खरेदीला विशेष महत्त्व असते. दिवाळीत नवीन इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेण्याकडे ग्राहकांचा कल असतो. त्यामुळे या काळात कंपन्या, विक्रेत्यांकडून विविध आकर्षक सवलती जाहीर केल्या जातात. यंदा वाढत्या किमती, दुष्काळ आणि महागाईमुळे ग्राहक खरेदी करताना विचारपूर्वक निर्णय घेत असले, तरी सणासुदीच्या खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात बाजारपेठांमध्ये उतरतील असा विश्वास दुकानदारांना आहे.
गेल्या काही वर्षात एआयच्या उत्क्रांतीमुळे मेमरीकार्ड आणि रॅमचिपच्या किमती वाढल्या आहेत. त्याचा परिणाम सर्वात जास्त मोबाइलवर झाला आहे. बाजारात उपलब्ध मोबाइल, फ्रिज, वॉशिंगमशीन आणि एलईडीसारखी उत्पादने आता चैनीच्या वस्तू राहिल्या नसून आधुनिक जीवनाची गरज म्हणून पूढे येत आहेत. त्यामुळे त्यांच्या खरेदीवर विशेष परिणाम दसऱ्यात झाला नव्हता आणि तसेच चित्र दिवाळीतही राहिल अशी बाजारपेठेची अपेक्षा आहे.
सध्या महिनाअखेरीमुळे बाजारात गर्दी कमी दिसते. नवीन महिना सुरू झाल्यानंतर ग्राहकांची खरेदी वाढेल. दसऱ्यात महागाई किंवा दुष्काळाचा फारसा परिणाम खरेदीवर जाणवला नाही. दिवाळीत एसी, फ्रिज आणि एलईडी टीव्हीला चांगली मागणी राहील. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आम्ही प्रॉडक्ट आणि दुकानानुसार अनेक सवलती आणल्या आहेत. यात कॅशबॅक, लॉटरी, आणि दुचाकी गिफ्ट अशा अनेक बाबींचा समावेश आहे.
– प्रीतम भालगट, प्रवीण एजन्सीज
दसऱ्यात बाजारपेठेला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे दिवाळीतही अशीच विक्री होईल, अशी अपेक्षा आहे. एआय चिप्सच्या बाजारपेठेतील बदलांचा परिणाम मोबाइलवर होत आहे. मोबाइल ही आता गरज बनली असल्याने ग्राहक त्याची खरेदी करतातच. ग्राहकांसाठी आम्ही दोन वर्षांपर्यंतची विस्तारित वॉरंटी, खात्रीशीर आकर्षक भेटवस्तू, कॅशबॅक आणि सुलभ वित्तपुरवठ्याच्या योजना उपलब्ध केल्या आहेत.
– घनश्याम धिन्नी, एसएस मोबाईल्स
दसऱ्यात वाढत्या किमतींमुळे बाजारपेठेत काही घट जाणवली. मात्र, दिवाळीत चांगली विक्री होण्याची अपेक्षा आहे. मोबाइल, एसी आणि फ्रिजला मोठी बाजारपेठ उपलब्ध असून, ग्राहकांना खरेदी करणे सोपे जावे, यासाठी कॅशबॅक आणि दीर्घ मुदतीच्या हप्त्यांच्या (ईएमआय) योजना आम्ही आणल्या आहेत
– गुरप्रीत सिंग, महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स





