Electrocution Accident: भोर तालुक्यात महावितरणचा निष्काळजीपणा? वीजतारेचा धक्का लागून वानराचा जागीच मृत्यू
Electrocution Accident: वीजवाहक तारांच्या विळख्यात अडकल्याने वानराने सोडले प्राण; वारंवार तक्रार करूनही महावितरणचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचा ग्रामस्थांचा आरोप.

Electrocution Accident – भोर तालुक्यातील विसगाव खोऱ्यातील नेरे व परिसरात अन्न-पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानव वस्तीकडे येण्याच्या घटना वाढल्या आहेत. डोंगर भागात अन्न व पाण्याच्या कमतरतेमुळे हे प्राणी गावांकडे धाव घेत आहेत. दरम्यान, सोमवारी (दि. १३) नेरे येथे घरांवरून उड्या मारताना एका वानराचा वीजवाहक तारांना स्पर्श होऊन, विजेचा तीव्र धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाला.
नेरे परिसराच्या चहूबाजूला डोंगररांगा आणि घनदाट जंगल असल्याने येथे वन्यप्राण्यांचा मोठा वावर आहे. जंगलात नैसर्गिक खाद्य उपलब्ध होत नसल्याने वानरांचे कळप, भेकर, तरस, लांडगा, कोल्हा आणि मोर यांसारखे वन्यप्राणी गावांच्या परिसरात येत असतात. इतर प्राणी अन्न-पाणी शोधून पुन्हा जंगलाकडे निघून जातात; मात्र वानरांचे कळप गावातील घरांवर आणि झाडांवरच तळ ठोकून असतात.
गावांमधून गेलेल्या उघड्या वीजवाहक तारांजवळून उड्या मारताना वानरांना विजेचा धक्का लागून जीव गमवावा लागत आहे. गेल्या वर्षभरात नेरे परिसरात अशा तीन ते चार घटना घडल्या आहेत. वन्यप्राण्यांच्या जिवावर बेतणाऱ्या या दुर्घटना रोखण्यासाठी महावितरणने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी वारंवार केली आहे. मात्र, महावितरण याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
स्थानिकांचे वाचवण्याचे प्रयत्न अपयशी
वानराला विजेचा धक्का लागताच त्याला वाचवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी धाव घेतली आणि अथक प्रयत्न केले. मात्र, वीजवाहक तारांच्या विळख्यात वानर अडकल्यामुळे त्याला वेळेत बाहेर काढणे शक्य झाले नाही आणि त्याचा जीव गेला, अशी माहिती स्थानिक नागरिक आनंदा बढे यांनी दिली.





