नारायणगाव – वारुळवाडी (ता. जुन्नर) ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याचे कॉंक्रिटीकरणासह रुंदीकरणाचे काम मागील एक महिन्यापासून वेगाने सुरू आहे. रस्त्याचे रुंदीकरण करीत असताना पूर्वीचे वीज वाहक खांब रस्त्यात आले असून रस्त्याच्या रुंदीकरणास अडचणीचे ठरत आहे.
या संदर्भात महावितरणचे नारायणगाव येथील अधिकारी बनकर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी वारूळवाडी रस्त्यावरील वीज वाहक खांब काढून घेण्यासाठी लागणाऱ्या निधीचा प्रस्ताव मंजुरीसाठी एक महिन्यापूर्वी मंचर येथील वरिष्ठांकडे पाठविला असल्याचे सांगितले. तर मंचरचे वरिष्ठ अधिकारी बांगर यांनी माझ्याकडे प्रस्ताव आला असेल तर तो मी मंजूर केला असेल,
असे ढोबळ मानाने उत्तर दिले. व पुढील जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची असल्याचे सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी ज्ञानदेव रायकर यांनी निधी उपलब्ध झाला नसल्याचे सांगितले असून संबंधित काम हे महावितरणचे असल्याचे सांगितले.
ग्रामपंचायतीचे पत्र
वारुळवाडीतील रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणासह रुंदीकरणास अडथळे ठरत असलेले महावितरणचे वीज वाहक खांब त्वरित काढून घेण्यात यावे, असे पत्र वारुळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र मेहेर यांनी जुन्नर सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरणला दिले आहे. वीजवाहक खांब काढल्याशिवाय रस्त्याचे कॉंक्रिटीकरण व रुंदीकरणाचे पक्के काम करू नये, अशी विनंती सार्वजनिक बांधकाम विभागाला करण्यात आली आहे.