सातगाव पठारावर शेतीसाठी वीज उपलब्ध होणार

पेठ – सातगाव पठार (ता. आंबेगाव) येथे एसीएफ जिल्हा निधीअंतर्गत अंदाजे तीन कोटी रुपयांच्या पेठ उपकेंद्राच्या क्षमता वाढ विकासकामास सुरुवात झाली आहे. सातगाव पठार भागामध्ये कृषी पंपांच्या हंगामामध्ये सातत्याने वीज पुरवठा खंडित होणे, कमी दाबाने वीज पुरवठा होणे अशा अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावी लागत होते. यामुळे विहिरीमध्ये सीझनमध्ये पाणी असूनसुद्धा शेतकऱ्यांना पिकांना पाणी भरण्यास अडचणी येत होत्या.
येथे 30 केवी पेठ उपकेंद्राची क्षमता वाढ होऊन नवीन पाच एमव्हीए क्षमतेचा पॉवर ट्रान्सफॉर्मर बसवणे अत्यंत गरजेचे होते त्यासाठी सातगाव पठार परिसर नागरिक व लोक प्रतिनिधी सातत्याने पाठपुरावा करत होते. महावितरणचे अधिकारी मुख्य अभियंता पुणे परिमंडळ राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता एस. पणीकर, शैलेश गीते, राहुल केंकान यांनी या कामासाठी प्रशासकीय प्रस्ताव तयार करून मंजुरी मिळवली आणि निविदा प्रक्रियातून ठेकेदार मे. स्पेस ऐज असोससिएट यांना देण्यात आले.
काल (दि. 17) या कामाला पेठ उपक्रमांतर्गत प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. या क्षमता केंद्रामुळे सातगाव पठारमध्ये कमी दाबाचा प्रश्न मिटणार आहे. यावेळी मंचर बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक सचिन पानसरे, शरद सहकारी बॅंकेचे संचालक संतोष धुमाळ, उपसरपंच मयूर काळे, तंटामुक्ती माजी अध्यक्ष रवींद्र धुमाळ, वाकेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक मंगेश पवळे, भाऊ सावंत, संजय पवळे, संतोष धुमाळ, राजू रोडे, दिलीप शिंदे आणि पेठ ग्रामस्थ उपस्थित होते.





