विजेचा लपंडाव, नागरिक हैराण

कान्हे : मावळ तालुक्यात ग्रामीण भागात मागील आठवडाभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. दिवसासह रात्री देखील वादळी वाऱ्यासह मान्सून वर्षाव होत आहे. या पावसामुळे ग्रामीण भागातील निसर्ग एकीकडे फुलला असताना ह्याच पावसाने ग्रामीण भागातील जनतेला मात्र काही अडचणींचा सामना देखील करावा लागत आहे. पावसामुळे महावितरणच्या विद्युत पुरवठ्यात अडचणी निर्माण होत असून काही गावे अथवा वाडी वस्त्यांना दोन-दोन दिवस विजेअभावी राहावे लागत आहे. यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. कान्हे परिसरातील गावे, वाडीवस्तीवर सध्या हे चित्र पाहायला मिळत आहे.
कान्हे परिसरात डोंगराळ भागात गेली आठवडाभरापासून सातत्याने मुसळधार पाऊस कोसळत आहे. काही क्षणांची विश्रांती घेतली की पुन्हा पावसाला सुरूवात होत आहे. यातही सकाळच्या सुमारास, सायंकाळी आणि रात्री जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. अशात ह्या पावसाने कान्हे सहीत नाणे मावळ, टाकवे बुद्रुक परिसर येथील ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा वारंवार विस्कळीत होत आहे.
मावळ तालुक्यात ग्रामीण भागात अलिकडच्या काही दिवसांत विजेचा अखंडित पुरवठा होणे, ही बाब काहीशी दुर्मिळ बनली आहे. वेळी अवेळी खंडित होणाऱ्या विजपुरवठ्याने नागरिक हैराण झालेत. ग्रामीण भाग असला तरीही हल्ली नागरिकांची अनेक कामे ही विजेवर अवलंबून असतात, अशात दिवसभर किंवा दोन दोन-दोन दिवस विजेचा पुरवठा न होणे, ही गोष्ट सामान्यांच्या हिताची नव्हे तर त्यांच्यासाठी अन्याकारक आहे. शहरी भागात होतो, तसाच अखंडित विजपुरवठा ग्रामीण भागात का होऊ शकत नाही, असा रोकडा सवाल ग्रामीण भागातील नागरिक करीत आहेत.
विजेअभावी रखडतात अनेक कामे
वीज हा सध्या प्रत्येकाच्यात जीवनाचा अविभाज्य घटक आहे. जिवनावश्यक गरजांमध्ये वीज प्राधान्याने येते. नागरिक गावातील असो की शहरातील, तो बऱ्याचअंशी हल्ली विजेवर अवलंबून आहे. अगदी मोबाइलच्या चार्जिंगपासून ते घरात होणारा पाणीपुरवठा, अनेक गोष्टी विजेवर अवलंबून आहेत. गावखेड्यात विजेअभावी सर्वाधिक हाल होतात ते महिलांचे. पाण्याच्या मोटारी बंद पडल्यास भर पावसातही त्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. सोबत विजेअभावी विद्यार्थ्यांचा अभ्यास रखडतो. लहान मोठे उद्योग व्यवसाय असणाऱ्या सामान्यांच्याही जीवनावर याचा विपरित परिणाम होतो. विद्युत विभाग पावसाळ्यापूर्वीची कामे म्हणून ग्रामीण भागात जुने खांब बदलणे, वीज वाहक तारांची तपासणी करणे, तारांना अडथळे ठरणारे वृक्ष छाटणे अशी कामे करतात. परंतु आजमितीस तालुक्यात सर्वत्र ही कामे पूर्ण झालेली किंवा प्रामाणिकतेने झालेली दिसत नाहीत. याचा फटका आता ऐन पावसाळ्यात ग्रामीण भागातील जनतेला बसत आहे. सोबत वीज कर्मचारी सहकार्य करत नाहीत, ही तक्रार तर नेहमीचीच आहे.
किमान दहा हजार लोकसंख्या असलेल्या पाच गावांसाठी एक कंत्राटी आणि एक कायमस्वरूपी असे दोन वीज कर्मचारी काम करत असतात. मागील तीन महिन्यांत एकही दिवस असा नाही, ज्या दिवशी संपूर्ण दिवसभर गावात वीज होती. दुग्ध व्यावसायिक, दुकानदार यांचे यामुळे प्रचंड नुकसान होत आहे. तर, लहान मुले, वयोवृद्ध यांना देखील त्रास सहन करावा लागतो.
– प्रमोद ओव्हाळ, नागरिक कान्हे
फिडरची लांबी जास्त असल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. जेव्हा वीज पुरवठा खंडित होतो, तेव्हा आमचे कर्मचारी त्याठिकाणी उपस्थित राहून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत असतात. सध्या पावसाचे दिवस असल्याने अनेक तांत्रिक अडचणी येतात, त्यामुळे वीज पुरवठा खंडित होत आहे. परंतु, यापुढील काळात वीज पुरवठा सुरळीत चालू राहील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
– राहुल परदेशी, उप कार्यकारी अभियंता, वडगाव मावळ





