खडकवासला धरणातील पाण्यापासून होणार वीजनिर्मिती

वीजनिर्मिती प्रकल्प अंतिम टप्प्यात
पुणे – खडकवासला धरणातील पाण्यावर वीजनिर्मिती प्रकल्प उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर धरणातून मुठा उजवा कालव्यात शेतीसाठी सोडल्या जाणाऱ्या पाण्यावर 1.2 मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात येणार आहे.
खडकवासला धरणातून मुठा उजवा कालव्यात सोडल्या जाणाऱ्या पाण्यावर वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प मंजूर करण्यात आला. त्यानुसार या प्रकल्पात 600 किलोवॅटच्या दोन जनित्रांद्वारे 1.2 मेगावॅट वीजनिमिती करण्याचे नियोजन आहे. हा प्रकल्प “बीओटी’ तत्त्वावर करण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे, डिसेंबर 2010 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करणे अपेक्षित होते.
परंतु कालवा बंद करून खोदाईचे काम करण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे मागील काही वर्षांपासून वीजनिर्मिती प्रकल्पाचे काम रखडले होते. खडकवासला धरणातून कालव्यात शेतीसाठी पाणी सोडल्यावर त्याच्या मुखाशीच पॉवर हाऊस बांधून जनित्रांद्वारे वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. यानंतर पाणी पुन्हा कालव्यात सोडण्यात येणार आहे. मागील दोन वर्षांपासून या कामाने गती घेतली आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागातील सूत्रांनी दिली. पानशेत आणि वरसगाव धरणांच्या उभारणीनंतर या ठिकाणी पॉवर हाऊस बांधण्यात आले. या दोन्ही धरणातून खडकवासला धरणात सांडव्यातून पाणी सोडताना विद्युतनिर्मिती केली जाते. त्याच धर्तीवर आता खडकवासला धरणातून वीजनिर्मिती केली जाणार आहे. साधारणपणे कालवा 170 दिवस सुरू असतो. त्यामुळे शेतीसाठी पाणी सोडल्यानंतर वीजनिर्मिती होणार आहे.





