सातारा – वीज ग्राहकांना जास्तीत जास्त जलद सुविधा मिळण्यासाठी महावितरणने पावले उचलली आहेत. याचा प्रत्यय गुरुवारी शाहपुरीकरांना आला. भरपावसात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी बंद पडलेला विद्युत ट्रान्सफॉर्मर काढून त्याठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवत लोकांना सुखद धक्का दिला.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडीत होत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे नागरिकांना घरातच थांबावे लागत आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी महावितरणचे अधिकारी, कर्मचारी प्रयत्न करत आहेत. शाहूपुरीतील आंबेदरे रस्त्यावरील विद्युत ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्यानंतर महावितरणच्यावतीने गुरुवारी भरपावसात नवीन विद्युत ट्रान्सफार्मर बसवण्यात आला.
महावितरणचे रामदास कार्वे, राजकुमार ताटे, शुभम भोसले, दत्तात्रय साठे यांनी यासाठी परिश्रम घेतले. पवार क्रेन सर्व्हिसची त्यांना मदत झाली. भरपावसात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जलद पावले उचलत जिवाची पर्वा न करता नवीन विद्युत ट्रान्सफॉर्मर बसवल्याने शाहूपुरीकरांमधून समाधान व्यक्त होत आहे.