Electric Wire Theft : खटावमध्ये चोरांचा हैदोस! ७ खांबांवरील ७ हजार फूट तार लंपास; शेतकरी संकटात
Electric Wire Theft : चोरट्यांनी तार नेण्यासाठी वापरला टॅक्टर; तक्रार करण्यासाठी फोन केला असता महावितरणच्या शाखा अभियंत्याने मोबाईल केला बंद.

Electric Wire Theft – खटाव येथील लालबाग शिवारातील महावितरणच्या सात खांबांवरील अल्युमिनियमच्या सात हजार फूट तारेची चोरी झाली आहे. त्यामुळे विहिरीत पाणी असूनही, ते पिकांना देता येत नसल्याने, शेतकर्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीला कोण जबाबदार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
याबाबत माहिती अशी, बुध येथील संतोष रंगराव सूर्यवंशी यांचे लालबाग शिवारात शेत आहे. त्या शेतात महावितरणचे सात खांब असून, त्यावरील अल्युमिनियमची सात हजार फूट तार चोरीस गेली आहे.. त्यामुळे शेतकर्यांना पिकांना पाणी देणे अशक्य झाल्याने, त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
संतोष सूर्यवंशी, छत्तीसगड येथे नियुक्त असलेले लष्करातील जवान अमोल आणि जम्मू-काश्मीरमध्ये देशसेवा करत असलेले जवान संदीप यांची बुध येथील गट नं. 125 व 226 मध्ये शेती आहे. या शेतीत कांदा, गहू, मेथी व भुईमूग अशी पिके आहेत. संतोष सूर्यवंशी हे कांद्याला पाणी देण्यासाठी शनिवारी सकाळी शेतामध्ये गेले असता, मोटार सुरू झाली नाही.
त्यांचे विजेच्या खांबाकडे लक्ष गेले असता, विद्युतवाहक तारा दिसल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी परिसरात पाहणी केली असता, सात खांबांवरील तारा चोरीस गेल्याचे आणि या तारा चोरून नेण्यासाठी टॅक्टरचा वापर केला गेल्याचे निदर्शनास आले.
याबाबत माहिती देण्यासाठी त्यांनी महावितरणचे शाखा अभियंता आटपाडकर यांना फोन केला असता, त्यांनी फोन उचलला नाही. दोन-तीन वेळा फोन केल्यानंतर त्यांनी मोबाइल बंद करून ठेवला. अधिकार्यांनी असे केले, तर शेतकर्यांनी काय करायचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.





