Electric Vehicles Sale : ११३ रुपयांचे पेट्रोल परवडेना! सातारकरांनी शोधला कडक तोडगा; ई-वाहनांच्या खरेदीत रेकॉर्ड ब्रेक वाढ
Electric Vehicles Sale : पेट्रोल आणि डीझेलच्या गगनाला भिडलेल्या दरांमुळे नागरिक हैराण; जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत ५० हजारांहून अधिक इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी.

Electric Vehicles Sale – पेट्रोल, डीझेलच्या दरांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पीएम सूर्यघर योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असताना, जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत 50 हजार ई-वाहनांची खरेदी झाली आहे. त्यातून जिल्ह्याची पर्यावरणपूरक प्रवासाकडे वाटचाल सुरू असून, ई-वाहन खरेदीकडे नागरिकांचा कल दिवसेंदिवस वाढत आहे.
पर्यावरणपूरक जीवनशैलीकडे वाटचाल करताना, सातारा जिल्हा ई-वाहनांच्या वापरात झपाट्याने पुढे जात आहे. राज्य शासनाच्या पर्यावरणपूरक धोरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून, गेल्या तीन वर्षांत 50 हजारांहून अधिक इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी झाली आहे. प्रदूषण आणि इंधन दरवाढीमुळे नागरिक ई-वाहनांना पसंती देत आहेत.
सार्वजनिक व खासगी वाहतूक व्यवस्थेतही या वाहनांचा वापर वाढत असून, मागील तीन वर्षांच्या तुलनेत यंदा सहा हजारांहून अधिक ई-वाहने नागरिकांनी खरेदी केली आहे. गेल्या काही वर्षापासून पेट्रोल, डीझेलचे दर प्रचंड वाढले आहेत. इराण-अमेरिका युद्धामुळे या दरात आणखी वाढ झाली आहे. सद्यःस्थितीत नागरिकांना एक लिटर पेट्रोलसाठी 113 रुपये, डीझेलसाठी 97 रुपये मोजावे लागत असून, त्याचा सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसत आहे.
परिणामी पेट्रोल व डीझेलवरील वाहनांना पर्याय म्हणून ई-वाहनांकडे पाहिले जात आहे. नागरिक आता इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देत असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणार्या नागरिकांना परिवहन विभागाकडून विविध सवलती देण्यात येत असून, नोंदणी शुल्क आकारण्यात येत नाही. इलेक्ट्रिक दुचाकीच्या किमती 70 ते 80 हजारांपासून तीन लाखांपर्यंत आहेत. मागील काही वर्षात ई-वाहनांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आल्याने बॅटरीच्या क्षमता वाढल्या आहेत. चांगल्या दर्जाच्या वाहनांना मागणी वाढत आहे. ई-वाहनांच्या वापराने प्रदूषणालाही आळा बसत आहे.





