पुणे | सहकारी संस्थांच्या निवडणुकांना तूर्त स्थगिती

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – विधानसभेच्या निवडणूक कामकाजासाठी सहकार विभागातील अधिकारी-कर्मचारी यांच्या सेवा अधिग्रहीत केल्या जातील. त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका घेताना अडचणी विचारात घेता राज्य शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुका दि.31 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्या आहेत.
2024-25 या वर्षात राज्यातील 29 हजार 429 सहकारी संस्थांची निवडणूक प्रलंबित आहे. त्यापैकी 7 हजार 109 सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.
जून 2024 मध्ये पावसाची परिस्थिती विचारात घेऊन शासनाने 20 जून रोजी सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली होती.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दि.1 ऑक्टोबरपासून सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले होते.
आता प्राधिकरणाच्या आदेशाला स्थगिती देत या निवडणुका पुढे ढकलण्याचा आदेश सहकार विभागाचे अवर सचिव अनिल चौधरी यांनी जारी केला आहे.
यामुळे पुणे शहरातील 828 आणि ग्रामीण भागातील 2 हजार 220 मिळून एकूण 3 हजार 48 सहकारी संस्थांच्या निवडणुकांना या आदेशामुळे स्थगिती मिळाली आहे.
दरम्यान, राज्यातील 250 पेक्षा किंवा त्यापेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था, तसेच ज्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने किंवा उच्च न्यायालयाने सहकारी संस्थेची निवडणूक घेण्याचे आदेश केले आहेत,
अशा संस्था तसेच निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केवळ संस्थेचे अध्यक्ष , उपाध्यक्ष निवड बाकी आहे, अशा सहकारी संस्था वगळून अन्य सहकारी संस्थांच्या निवडणुका या आदेशाच्या दिनांकापासून ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर स्थगिती देण्याचा आदेश शासनाने जारी केला आहे.




