Pune District : राजगड तालुक्यात निवडणूक प्रतिष्ठेची होणार

विंझर : वेल्हे (राजगड) तालुक्यात जिल्हा परिषद (जि.प.) आणि पंचायत समिती (पं.स.) निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, यंदाची निवडणूक केवळ स्थानिक नाही, तर विधानसभेच्या लढाईची पुनरावृत्ती ठरणार आहे. माजी आमदार संग्राम थोपटे (भाजप) आणि विद्यमान आमदार शंकर मांडेकर (राष्ट्रवादी – अजित पवार गट) यांच्यातील प्रतिष्ठेच्या लढाईमुळे या निवडणुकीला वेगळे महत्त्व निर्माण झाले आहे. नुकताच अमोल नलावडे यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्याने राजकीय भूकंपाचे संकेत मिळत आहेत.
बदललेली राजकीय समीकरणे
वेल्हे तालुक्यात अनेक वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवून मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे आमदार शंकर मांडेकर यांनी विजय मिळवला होता. आता, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने मांडेकर गट तालुक्यात आपली पकड अधिक मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे. दुसरीकडे, माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि इतर पक्षांतील अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करत आपले बळ वाढवले आहे. मांडेकर यांनी सुरू केलेल्या विकासकामांच्या ‘धडाक्या’मुळे आणि थोपटे यांच्या मजबूत संघटनात्मक बांधणीमुळे ही लढत अत्यंत चुरशीची होणार आहे.
निर्णायक क्षण
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात या निवडणुकीतील सर्वात मोठा ‘ट्विस्ट’ म्हणजे माजी जि.प. सदस्य अमोल नलावडे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला आहे. नलावडे यांचा मोठा आणि निष्ठावान समर्थकवर्ग त्यांच्यासोबत अजित पवार गटात सामील झाल्याने, निवडणुकीच्या समीकरणांना मोठी कलाटणी मिळाली आहे. नलावडे यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
मुख्य लढत भाजप विरुद्ध राष्ट्रवादीतच
वेल्हे तालुक्यात यंदाची जि.प. आणि पं.स. निवडणूक प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात थेट आणि दोन ध्रुवीय होण्याची शक्यता आहे. या दोन्ही प्रमुख पक्षांव्यतिरिक्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) यांचे कार्यकर्तेही उमेदवारीसाठी प्रयत्नात आहेत. मात्र, स्थानिक नागरिकांच्या मते, विधानसभेप्रमाणेच यंदाची जि.प. – पं.स. निवडणूक देखील तालुक्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारी ‘निर्णायक’ निवडणूक ठरणार आहे.
आरक्षण सोडत: इच्छुकांच्या भावनांचा कल्लोळ
ऑक्टोबर २०२५ मध्ये काढण्यात आलेल्या राजगड (वेल्हे) पं.स. च्या चार गणांच्या आरक्षण सोडतीमुळे मोठी खळबळ माजली आहे. चारपैकी दोन जागा महिलांसाठी (एक सर्वसाधारण आणि एक इतर मागास प्रवर्गासाठी) आरक्षित झाल्या आहेत, तसेच सभापतीपदही महिलांसाठी आरक्षित झाले आहे. या सोडतीमुळे अनेक जुन्या आणि प्रबळ इच्छुकांमध्ये नाराजी पसरली आहे, तर काहींचे स्वप्न पूर्ण झाल्याने उत्साह संचारला आहे.या बदललेल्या परिस्थितीमुळे तळागाळात पोहोचलेल्या इच्छुकांनी सोशल मीडिया, व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि गावोगावच्या छोट्या-मोठ्या कार्यक्रमांना उपस्थिती लावत प्रचाराला सुरुवात केली आहे. या निवडणुकीत वेल्हे तालुक्यात कोण बाजी मारणार आणि जि.प. – पं.स.वर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.




