चंदीगड : देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. मतमोजणीस सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात झाली असून सुरुवातील कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र सध्या दिसत आहे. पंजाबमध्ये आपने ८६ जागांवर आघाडी घेतली असून सत्ताधारी काँग्रेस केवळ १६ जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे.
पंजाबमध्ये विधानसभेच्या एकूण ११७ जागा आहेत. राज्यात बहुमतासाठी ५९ जागांचे संख्याबळ असणे आवश्यक आहे. २०१७ पंचवार्षिक निवडणुकांमध्ये राज्यात काँग्रेसला बहुमत मिळाले होते. त्यावेळी काँग्रेसला ७७ जागा मिळाल्या होत्या. तर आम आदमी पक्षाने २० जागा जिंकत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काम पहिले. शिरोमणी अकाली दलाला १५ तर भाजपला ३ जागांवर समाधान मानावे लागले होते.
यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मात्र आपने जबरदस्त कामगिरी करत ८६ जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेसला मात्र चांगलाच फटका बसला असून त्यांना केवळ १६ जागांवर आघाडी आहे. अर्थात हे निकालांचे सुरुवातीचे कल असल्याने या आकडेवारीमध्ये पुढील फेऱ्यांतील मतमोजणीनंतर बदल होऊ शकतात.
पंजाब विधानसभा निवडणूक २०१७
एकूण जागा: ११७
बहुमत: ५९
काँग्रेस: ७७
आप: २०
शिरोमणी अकाली दल : १५
भाजप: ३
लोक इंसाफ पार्टी : २