अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले यांची निवड

मुंबई – पंचवार्षिक नाट्य परिषद निवडणूक मध्यंतरी पार पडली पण अध्यक्षपद कोणाकडे जाणार याची प्रतिक्षा सगळ्यांनाच लागली होती. त्यात मंगळवारी अध्यक्षपदासाठीची निवडणूक पार पडली ज्यामध्ये नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी अभिनेते प्रशांत दामले यांची निवड झाली आहे.
प्रसाद कांबळी यांचे “आपलं पॅनल’ आणि प्रशांत दामले यांचे “रंगकर्मी समूह’ या दोन गटांमध्ये या निवडणूकीत चांगलीच चुरस पाहायला मिळाली. कांबळी आणि दामले या दोघांमध्ये कोण लढत जिंकणार याची उत्सुकता ताणली गेली होती. अखेर दामले 60 पैकी 50 मते मिळवत अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत.
प्रशांत दामलेंच्या “रंगकर्मी नाटक समूहा’चे कार्यकारिणीवर वर्चस्व पाहायला मिळत आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 11 जणांची कार्यकारिणीवर निवड करण्यात आली आहे. यात सुशांत शेलार, गिरीश महाजन, विजय चौगुले, संजय देसाई, दीपा क्षीरसागर, सविता मालपेकर, संदीप पाटील, विशाल शिंगाडे, विजयकुमार साळुंखे, संजय रहाटे, दीपक रेगेंचा कार्यकारिणीत समावेश आहे.
नाट्य निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी यांनी पत्रकार परिषद घेत अध्यपदाच्या निवडणूकीसंदर्भात माहिती दिली. “नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी दामले यांची तर उपाध्यक्षपदी नरेश गडेकर यांची निवड झाली आहे. कार्यवाहपदी अजित भुरे निवडून आले आहेत. तर कोषाध्यक्षपदी सतिश लोटके यांची निवड झाली आहे. उपाध्यक्ष उपक्रमपदी भाऊसाहेब भोईर यांची बिनविरोध निवड झाली,’असे दळवी यांनी यावेळी म्हटले आहे.
विजयी-
अध्यक्ष- प्रशांत दामले
सहकार्यवाह- समीर इंदुलकर, दिलीप कोरके, सुनील ढगे
उपाध्यक्ष – नरेश गडेकर
उपाध्यक्ष उपक्रम- भाऊसाहेब भोईर
खजिनदार- सतीश लोटके
पराभूत-
प्रसाद कांबळी
सुकन्या कुलकर्णी
ऐश्वर्या नारकर
अविनाश नारकर




