साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदी माधव कौशिक यांची निवड

नवी दिल्ली – देशाच्या साहित्य क्षेत्रात अतिशय महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ हिंदी साहित्यिक आणि अकादमीचे उपाध्यक्ष माधव कौशिक यांची निवड झाली आहे. या निवडणुकीत ज्येष्ठ मराठी साहित्यिक रंगनाथ पठारे पराभूत झाले. तसेच उपाध्यक्षपदी दिल्ली विद्यापीठाच्या प्रोफेसर कुमुद शर्मा यांची निवड झाली आहे. साहित्य अकादमीच्या इतिहासात प्रथमच एका महिलेची निवड झाली आहे. दरम्यान, यंदाही उपाध्यक्षाची अध्यक्षपदी निवड करण्याची परंपरा कायम राहिली.
नवी दिल्लीतील रविंद्र भवन येथे साहित्य अकादमीच्या कार्यकारिणी निवडणूकीसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यात साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदासाठी तिरंगी लढत झाली. त्यात रंगनाथ पठारे यांच्यासह माधव कौशिक आणि ज्येष्ठ कन्नड साहित्यिक मल्लपुरम व्यंकटेश रिंगणात होते. तर एकूण 97 जणांनी मतदान केले. त्यात कौशिक यांना 60, मल्लपुरम व्यंकटेश यांना 35, तर पठारे यांना फक्त 3 मते मिळाली.
उपाध्यक्षपदासाठी कुमुद शर्मा आणि राधा कृष्णन रिंगणात होते. त्यांनी राधा कृष्णन यांचा केवळ एका मताने पराभव केला. कुमुद शर्मा यांना 50, तर राधा कृष्णन यांना 49 मते मिळाली. दरम्यान, माधव कौशिक आता मावळते अध्यक्ष चंद्रशेखर कम्बार यांच्याकडून पदभार स्वीकारतील.
माधव कौशिक हे हरियाणातल्या भिवानीचे आहेत. त्यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1954 रोजी. त्यांनी हिंदीत विपुल लेखन केले आहे. हिंदी कविता, कथा, बालसाहित्य, गझल या क्षेत्रात त्यांनी नावलौकिक मिळवले आहे. “सारे सपने बागी है’, “ऐनो के शहर में’, “किरण की सुभा’, “सपने खुली निगाहों के’, “हाथ सलामत रहने दो’, “आसमान सपनों का’ आणि “सदी का सन्नाटा’ या त्यांच्या काही गाजलेल्या गझल आहेत.
मराठमोळा अध्यक्ष नाहीच
भारतीय भाषांचे संवर्धन करणाऱ्या साहित्य अकादमी या संस्थेची स्थापना 1952 मध्ये करण्यात आली आहे. पण आतापर्यंत या अकादमीचा अध्यक्ष मराठी लेखक होऊ शकलेला नाही. साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदासाठी दुसऱ्यांदा निवडणूक झाली आहे. याआधी भालचंद्र नेमाडे आणि यावेळी रंगनाथ पठारे हे अध्यक्षपदाच्या निवडणूकीत होते. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.





