Sahitya Akademi Award: साहित्य क्षेत्रातील अत्यंत मानाच्या साहित्य अकादमी पुरस्कार २०२५ च्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. मराठी भाषेतून जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ लेखक-चित्रकार राजू बाविस्कर यांच्या ‘काळ्यानिळ्या रेषा’ या आत्मचरित्राची आत्मचरित्र श्रेणीत निवड करण्यात आली आहे. मराठीतून शिफारस करण्यात आलेल्या एकूण ११ पुस्तकांमधून बाविस्कर यांच्या साहित्यकृतीची पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ‘काळ्यानिळ्या रेषा’ — एक वेगळे आत्मकथन राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या आत्मकथनात बाविस्कर यांनी आपल्या चित्रकला प्रवासासोबतच वंचित वर्गातील संघर्षाचे प्रभावी चित्रण केले आहे. हे पुस्तक विशेष गाजले असून त्याचा समावेश एमए अभ्यासक्रमातही करण्यात आला आहे. राजू बाविस्कर — लेखक आणि चित्रकार राजू बाविस्कर हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील असून ते एक प्रसिद्ध मराठी चित्रकार आणि लेखक आहेत. त्यांनी सप्तपुत ललित कला भवन, खिरोदा येथून एटीडी व एएम या चित्रकलेच्या पदव्या घेतल्या. १९९१ पासून ते पी. एम. मुंदडे माध्यमिक विद्यालय, पिंप्राळा, जळगाव येथे कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. बाविस्कर यांनी अनेक पुस्तकांची मुखपृष्ठे आणि आतील रेखाचित्रे तयार केली आहेत. विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधून त्यांची ५०० हून अधिक रेखाटने प्रसिद्ध झाली आहेत. उल्लेखनीय प्रदर्शने – बाविस्कर यांनी देशभरात अनेक एकल व सामूहिक चित्र प्रदर्शने भरवली आहेत. जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई (२०१८), आर्ट २ डे गॅलरी पुणे (२००८), अखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिक (२००५) यांसह देशातील प्रमुख व्यासपीठांवर त्यांनी आपली कला सादर केली आहे. पुरस्कार आणि सन्मान – बाविस्कर यांना यापूर्वीही अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ‘लक्ष्मीबाई टिळक वाङ्मय पुरस्कार’, मराठवाडा साहित्य परिषदेचा ‘यशवंतराव चव्हाण विशेष वाङ्मय पुरस्कार’, बॉम्बे आर्ट सोसायटी, ऑल इंडिया फाइन आर्ट्स अँड क्राफ्ट्स सोसायटी नवी दिल्ली, कॅम्लिन पुरस्कार आदी अनेक मानाच्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. पुरस्काराचे स्वरूप – साहित्य अकादमी पुरस्कारात बाविस्कर यांना सन्मानचिन्ह (कोरीव ताम्रपट), शाल आणि एक लाख रुपये रोख रक्कम दिली जाईल. ३१ मार्च २०२६ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित समारंभात हे पुरस्कार प्रदान केले जातील. इतर भाषांमधील विजेते – साहित्य अकादमीने यंदा २४ भाषांमधून ८ काव्यसंग्रह, ४ कादंबऱ्या, ६ लघुकथा संग्रह, २ निबंधसंग्रह, १ साहित्य समीक्षा ग्रंथ, १ आत्मचरित्र आणि २ स्मरणिकांची निवड केली आहे. हिंदीतून ममता कलिया यांच्या ‘जीते जी अलाहाबाद’ या स्मरणिकेची, इंग्रजीतून नवतेज सरना यांच्या ‘क्रिमसन स्प्रिंग’ या कादंबरीची, तर कोकणीतून हेन्री मेंडोका यांच्या ‘कोकणी काव्येमः रुपानी आणि रुपकम’ या निबंधसंग्रहाची निवड करण्यात आली आहे. मराठीतील इतर शिफारशी – मराठीतून यंदा ज्या ११ पुस्तकांची शिफारस करण्यात आली होती, त्यांत वसंत दत्तात्रय यांचा ‘कोलाहल’ (कवितासंग्रह), सतीश तांबे यांचा ‘काम तमाम ॲट वाघा बॉर्डर’ (लघुकथा संग्रह), शरद बाविस्कर यांचे ‘भूरा’ (आत्मचरित्र), अभिराम भडकमकर यांची ‘इन्शाअल्लाह’ (कादंबरी), रवींद्र इंगळे चावरेकर यांचा ‘सिंधुकालीन लिपी आणि भारतीय भाषांचे इतिहास’, देविदास फुलारी यांचा ‘रात्र भरत आहे’, बाबू बिरादार यांची ‘अधिवास’, किशोर कदम सौमित्र यांचा ‘बाऊल’ आणि रमेश डोंगरे यांचे ‘विंदांची कविता — शैलीवैज्ञानिक विश्लेषण’ यांचा समावेश होता.