निवडणूक अनियमितता ! महाराष्ट्रासाठी कॉंग्रेसकडून समिती स्थापन

नवी दिल्ली : मागील वर्षीच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता घडल्याचा आरोप कॉंग्रेसने लावून धरला आहे. त्या कथित अनियमिततांचे विश्लेषण करण्यासाठी आता पक्षाने एक समिती स्थापन केली आहे. संबंधित समितीच्या अध्यक्षपदाची धुरा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
दिल्लीत सोमवारी कॉंग्रेस श्रेष्ठींनी पक्षाच्या महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. त्यामध्ये निवडणूक आणि मतदान प्रक्रियेतील अनियमिततांसह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. बैठकीत समिती स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती त्यामध्ये सहभागी झालेल्या चव्हाण यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. त्यांच्या नेतृत्वाखालील समिती निवडणूक प्रक्रियेतील सुधारणांसाठी शिफारसी करेल. समिती प्रथम जनतेशी संवाद साधेल.
अनियमिततांचा मतदारसंखनिहाय आढावा घेईल. अनियमितता राहू नयेत या उद्देशातून शिफारसी केल्या जातील. त्यावर पुढील कार्यवाही करणे निवडणूक आयोगाच्या हाती असेल. निवडणूक आणि मतदान प्रक्रियेत सुधारणा व्हावी अशी कॉंग्रेसची इच्छा आहे, असे चव्हाण यांनी नमूद केले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मॅच-फिक्सिंग, मतचोरी झाल्याचा आरोप कॉंग्रेस आणि विशेषत: त्या पक्षाचे नेते राहुल गांधी सातत्याने करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर, कॉंग्रेसने समिती स्थापन करण्याच्या घडामोडीचे महत्व वाढले आहे.





