निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय: मतदार यादीवरील हरकतीसाठी 17 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीवरील हरकती आणि सूचनांसाठी राज्य निवडणूक आयोगाने 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवरील हरकतींसाठी 13 ऑक्टोबर ही अंतिम मुदत होती. आता ही मुदत वाढवून 17 ऑक्टोबरपर्यंत करण्यात आली आहे. यासोबतच, अंतिम मतदार यादी 28 ऑक्टोबरऐवजी 31 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध होणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी?
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या चार ते पाच वर्षांपासून ओबीसी आरक्षणासह विविध कारणांमुळे रखडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाकडे मुदतवाढीसाठी अर्ज दाखल केला होता. सर्वोच्च न्यायालयाने याला मान्यता देत 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुका घेण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता राज्यात जानेवारी 2026 अखेरपर्यंत या निवडणुका पार पडणार आहेत.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि गतिमान व्हावी, यासाठी आयोगाने सर्व तयारी पूर्ण केली असून, नागरिकांना हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी ही मुदतवाढ देण्यात आल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.






