Election Commission : कर्नाटक पोलिसांना आधीच माहिती दिली; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याचे स्पष्टीकरण

बंगळुरू : कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनीही कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचे आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला. डिसेंबर २०२२ मध्ये आलंदच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्याला विविध ॲप्सपच्या माध्यमातून ६ हजार १८ अर्ज प्राप्त झाले. मतदारांची नावे वगळण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऑनलाइन अर्ज आल्याने त्यांच्या सत्यतेविषयी साशंकता निर्माण झाली. त्यातून प्रत्येक अर्जाची पडताळणी करण्यात आली.
केवळ २४ अर्ज अस्सल आढळल्याने स्वीकारण्यात आले. उर्वरित ५ हजार ९९४ अर्ज अयोग्य आढळल्याने त्यातील मतदारांची नावे वगळण्यात आली नाहीत. ते अर्ज फॉर्म ७ च्या स्वरूपातील होते, असे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी निवेदन जारी करून म्हटले. राहुल यांनी कर्नाटक सीआयडीला माहिती पुरवण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली.
त्यावरही संबंधित निवेदनातून स्पष्टीकरण देण्यात आले. आयोगाकडे असणारी माहिती कर्नाटक पोलिसांना ६ सप्टेंबर २०२३ मध्येच उपलब्ध करण्यात आली, असे निवेदनात अधोरेखित करण्यात आले.





