निवडणूक आयोगाने तेजस्वींना दिली डेडलाईन; दुसरे मतदार ओळखपत्र सादर करावे लागणार
Tejashwi Yadav – निवडणूक आयोगाने राजदचे नेते तेजस्वी यादव यांच्यासाठी डेडलाईन जारी केली आहे. त्यांना बनावट असल्याचा संशय असणारे दुसरे मतदार ओळखपत्र (इपिक) १६ ऑगस्टपर्यंत सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
बिहारमधील विधानसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. तो राजकीय रणसंग्राम ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणे अपेक्षित आहे. त्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाने नुकत्याच प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या. त्यावरून बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते असणाऱ्या तेजस्वी यांनी आयोगाला घेरले.
त्यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत आपलेच नाव मतदार म्हणून गायब असल्याचा दावा केला. दाव्याच्या पुष्टीसाठी त्यांनी इपिक क्रमांकाच्या आधारे ऑनलाइन सर्चही करून दाखवले. संबंधित क्रमांक वापरून मतदार याद्यांत नाव आढळत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
त्यानंतर निवडणूक आयोगाने तेजस्वी यांनी पत्रकार परिषदेत नमूद केलेला क्रमांक आपण जारी केला नसल्याचे स्पष्टीकरण दिले. वेगळ्या क्रमांकाच्या आधारे तेजस्वी यांचे नाव मतदार यादीत असल्याचेही आयोगाने दाखवून दिले. तेजस्वी यांनी नमूद केलेल्या क्रमांकामुळे त्यांच्याकडे दुसरे बनावट मतदार ओळखपत्र असल्याचा संशय बळावला.
त्यामुळे संबंधित ओळखपत्र याआधीच आयोगाने मागवले. त्यावर तूर्त तरी तेजस्वी यांनी त्यांना २ मतदार ओळखपत्र जारी करण्यासाठी आयोगाला जबाबदार धरले आहे. त्यामुळे आयोगाने पुन्हा ॲक्शन मोडमध्ये येत तेजस्वी यांना ठराविक मुदत दिली आहे. बोगस सरकारी दस्तऐवजाचा वापर कायद्याच्या दृष्टीने गुन्हा असल्याचे आयोगाने त्यांना नव्याने पाठवलेल्या पत्रात अधोरेखित केले आहे.





