शिरूरमध्ये निवडणुकीचा रंग ! गट – गन जाहीर होताच मतदारांना साद; आखाडात स्नेहभोजन की निवडणूक प्रचार?

शिरूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जवळ येऊ लागल्या असताना शिरूर तालुक्यातील इच्छुक उमेदवारांनी आपापली राजकीय ताकद दाखवण्याचे रणशिंग फुंकले आहे. निवडणुकीच्या तोंडावर आखाडात ‘स्नेहभोजन’, ‘स्नेहमेळावा’, ‘विचारमंथन’, ‘कार्यकर्ता संवाद’ अशा नावांखाली गावागावात होणाऱ्या भव्य कार्यक्रमांमधून प्रत्यक्षात राजकीय गटबाजी, शक्तिप्रदर्शन व मतदारांवर प्रभाव टाकण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
गेल्या काही दिवसांत तालुक्यातील विविध गावांमध्ये नामांकित मंगल कार्यालये, लॉन्स आणि खुले मैदान यामध्ये या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. यामध्ये गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक मंडळी, वयोवृद्ध नेते, महिलावर्ग आणि युवकांचा मोठा सहभाग दिसून येत आहे. या कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून “हा एक स्नेहसंवाद आहे.
आम्ही कोणतेही राजकारण करत नाही” असा सुर आळवला जात असला तरी या कार्यक्रमांची भव्यता, आयोजकांची उपस्थिती, वक्तृत्व आणि पार्श्वभूमी पाहता स्पष्टपणे लक्षात येते की यामागे निवडणूक तयारीचा मोठा डाव आहे. प्रत्येक भोजन सोहळा हा एकप्रकारचा गटप्रदर्शनाचा मंच झाला आहे.
या स्नेहभोजनाच्या निमित्ताने इच्छुक उमेदवार कोणत्या गटात आहेत, कोणत्या राजकीय नेत्यांच्या पाठींब्यावर उतरणार आहेत, त्यांच्या पुढे कोण ‘गन’ (म्हणजे शक्तिशाली समर्थक, नेते, किंवा संघटना) उभ्या आहेत हे उघडपणे समोर येत आहे. काही ठिकाणी माजी आमदार, माजी सरपंच, स्थानिक जिल्हा परिषद सदस्य यांचाही पाठिंबा मिळवत हे इच्छुक आपली दावेदारी ठसवून सांगत आहेत.
या प्रकारच्या कार्यक्रमांमुळे मतदारांमध्ये चाचपणीचा काळ सुरू झाला आहे. कोणाचा झुकाव कुठे आहे, कोणत्या गावात कोणाचा प्रभाव आहे, कोणते सामाजिक गट कुठल्या उमेदवारासोबत आहेत. याचा अंदाज उमेदवार घेऊ लागले आहेत. याचा उपयोग ते आगामी प्रचारनिती ठरवण्यासाठी करत असल्याचेही बोलले जात आहे.
सध्या निवडणूक आचारसंहिता लागू नसल्याने उमेदवार खुलेपणाने अशा कार्यक्रमांचे आयोजन करून आखाड पार्टी देत आहे. राजकीय दृष्टिकोनातून हे कार्यक्रम कितपत परिणामकारक ठरणार हे येत्या काही महिन्यांत स्पष्ट होईल. सध्या मात्र शिरूर तालुका हे निवडणूकपूर्व राजकीय हालचालींचे केंद्र बनले असून प्रत्येक गावात ‘गट’ आखले जात आहेत आणि प्रत्येक इच्छुक ‘गन’सह रिंगणात उतरण्यास सज्ज झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.





