Jejuri : जेजुरीत दसरा उत्सवाची जय्यत तयारी
Jejuri : खंडेरायाचे वर्षातून ८ ते १० जत्रा-यात्रा उत्सव साजरे केले जातात; यामध्ये हा सर्वात मानाचा व मोठा दसरा उत्सव समजला जातो. अठरापगड जातीधर्मातील समाजबांधवांना दसरा उत्सवात मानपान आहेत.

जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाचा मर्दानी दसरा उत्सव मंगळवारी (दि. २०) साजरा होणार असून सायंकाळी ६ वाजता गडकोट आवारातून पालखी प्रस्थान होणार आहे. मध्यरात्री १ ते २ वाजण्याच्या सुमारास जयाद्री डोंगर रांगेत रमना परिसरातून देवभेट, आपटा पूजन, नगरप्रदक्षिणा करत बुधवारी (दि. २१) सकाळी पालखी सोहळा गडावर दाखल होऊन खंडास्पर्धेला सुरुवात होणार आहे. अशी माहिती प्रमुख वतनदार इनामदार राजेंद्र पेशवे, सचिन पेशवे, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे यांनी ग्रामस्थ मंडळाच्या नियोजन बैठकीत दिली.
खंडेरायाचे वर्षातून ८ ते १० जत्रा-यात्रा उत्सव साजरे केले जातात; यामध्ये हा सर्वात मानाचा व मोठा दसरा उत्सव समजला जातो. अठरापगड जातीधर्मातील समाजबांधवांना दसरा उत्सवात मानपान आहेत. हे मानपान सांभाळत आणि सामाजिक सलोखा जोपासत सर्व जेजुरीकर हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. सुमारे २२ तास चालणाऱ्या या उत्सवाला मर्दानी म-हाठमोळा दसरा असे नाव प्रचलित झाले आहे. या उत्सवाच्या नियोजनासाठी ग्रामस्थ मंडळ व देवसंस्थान विश्वस्त मंडळाच्या बैठकीचे आयोजन गुरुवारी (दि. १५) मल्हार गौतमेश्वर मंदिर येथे करण्यात आले होते.
यावेळी सचिव छबन कुदळे, नगरसेवक पै. कृष्णा कुदळे, रोहिदास माळवदकर, रामभाऊ माळवदकर-पाटील, संजय खोमणे-पाटील, सुधीर गोडसे, यशवंत दोडके, समीर मोरे, काशिनाथ मोरे, समीर मुलाणी, खंडू भालेराव, अनिल झगडे, ओंकार झगडे, सुशील राऊत, महादेव बारभाई, देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त विश्वास पानसे, मंगेश घोणे, अभिजित देवकाते, पोपट खोमणे, व्यवस्थापक आशिष बाठे उपस्थित होते. सचिव छबन कुदळे यांनी आभार मानले.
ग्रामस्थ आणि देवसंस्थान विश्वस्त मंडळात खडाजंगी ..
कडेपठार देवसंस्थान विश्वस्त मंडळ, ग्रामस्थ बैठकीला उपस्थित राहत नाहीत. त्यांनी ग्रामस्थांबरोबर समन्वय ठेवावा, नगारखान्याची दुरुस्ती करावी, दर्शन बारीला हिरवी नेट बसवली आहे, ती काढून घ्यावी आदी मागण्या ग्रामस्थांनी मांडल्या. तर मार्तंड देवसंस्थान विश्वस्त मंडळाने दर्शन रांगेसाठी स्थानिक कामगारांची नियुक्ती करावी, जेणेकरून स्थानिक मानकरी वर्गाला दर्शन घेणे सुलभ होईल. व्यवस्थापकांच्या कामकाज पद्धतीवर ग्रामस्थ तीव्र नाराज असून त्यांना बदलण्यात यावे. तसेच गडकोट आवारात ग्रामस्थ, मानकरी मंडळाचा फलक लावण्यात यावा, अशा मागण्या ग्रामस्थ व प्रमुख मानकऱ्यांनी केल्या. ग्रामस्थ मंडळाचा फलक लावण्यास जर मज्जाव केला, तर देवसंस्थांनच्या मानापानावर ग्रामस्थ बंदी घालतील, असा सूर उमटला. यावेळी काही विषयांवरून ग्रामस्थ व विश्वस्त यांच्यामध्ये खडाजंगी झाली.





