Ekvira Devi Temple : एकविरा गडावर दोन गट भिडले! पालखी सोहळ्याला गालबोट; नेमकं काय घडलं?
Ekvira Devi Temple : कार्ला गडावर पालखी सोहळ्यादरम्यान पनवेल आणि कल्याण कोळीवाडा गटात राडा; दगडफेकीमुळे काही काळ भीतीचे वातावरण.

Ekvira Devi Temple – चैत्र शुद्ध सप्तमी निमित्त कार्ला गडावरील आई एकविरा देवीचा पालखी सोहळा रवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला. मात्र मंदिर पायथ्याशी दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीमुळे या सोहळ्याला काही प्रमाणात गालबोट लागले होते. आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली असून मंदिरातील दर्शन व्यवस्था आणि सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. २५) रात्री पनवेल कोळीवाडा आणि कल्याण कोळीवाडा या दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. पालखी पुढे नेण्याच्या कारणावरून सुरू झालेला हा वाद गुरुवारी (दि. २६) दुपारी पुन्हा पेटला. यावेळी दोन्ही गट आमनेसामने येत हाणामारी आणि दगडफेक झाली. काही हुल्लडबाजांनी डोंगर उतारावरील सुक्या गवताला आग लावल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलीस प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून जमावाला पांगवले. स्थानिक मंडळी, देवस्थान ट्रस्ट आणि पोलिसांच्या मध्यस्थीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून गडावर आणि पायथ्याशी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. बुधवारी सायंकाळी पार पडलेल्या पालखी सोहळ्यात कोकणातून शंभरहून अधिक पालख्या सहभागी झाल्या होत्या. सर्व भाविकांनी शांततेत दर्शन घेतले होते. सध्या मंदिर परिसरात पुन्हा भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी दाखल होत आहेत.
“या घटनेनंतर सोशल मीडियावर विविध अफवा पसरत असल्याने कोणत्याही अपप्रचारावर विश्वास ठेवू नये. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून मंदिर दर्शन सुरळीत सुरू आहे.”
– दिनेश तायडे, पोलीस निरीक्षक, लोणावळा ग्रामीण
“हा वाद वैयक्तिक कारणातून झाला असून पालखी सोहळ्याशी त्याचा संबंध नाही. यात्रेसाठी दूरवरून येणाऱ्या भाविकांनी अशा वादांना बळी न पडता शांततेत दर्शन घ्यावे.”
– दिपक हुलावळे, अध्यक्ष, एकविरा देवस्थान ट्रस्ट




