एकता कपूरने मागितली भारतीय सैन्याची माफी

आल्ट बालाजी बॅनरवर प्रसारित झालेल्या “एक्सएक्सएक्स 2′ या वेबसिरीजवरून एकता कपूरने भारतीय सैन्याची माफी मागितली आहे. या वेबसिरीजमध्ये काही आक्षेपार्ह दृश्ये आहेत. म्हणून एकता कपूरने दिलगिरी व्यक्त केली आहे.
भारतीय सेनेप्रती आल्ट बालाजी या ऑनलाइन बॅनरला खूप आदर आहे, असेही एकताने म्हटले आहे. “एक्सएक्सएक्स 2′ मध्ये भारतीय सैन्याप्रती आक्षेपार्ह दृश्ये असल्याबद्दल एकताच्या विरोधात इंदौर आणि मध्य प्रदेशात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
वेबसिरीजच्या माध्यमातून अश्लीलता पसरवणे, धार्मिक भावना दुखावणे आणि राष्ट्रीय प्रतीकांचा अवमान करण्याचा आरोप तिच्यावर ठेवला गेला आहे. या वेबसिरीजमधील एका सीनमध्ये भारतीय लष्कराच्या गणवेशाला आक्षेपार्ह पद्धतीने दर्शवण्यात आले आहे.
एकताच्याविरोधातील “एफआयआर’ पोलिसांनी रद्द केल्यावर एकताच्या टीमने या वेबसिरीजमधील आक्षेपार्ह भाग हटवला. याशिवाय वेबसिरीजमधील हा भाग आक्षेपार्ह आणि चुकीचा होता. ही आमची चूक होती, अशी स्पष्ट कबुली एकताने दिली आहे.
मार्चमध्ये ऑनलाइन प्रसारित झालेल्या एपिसोडचे प्रॉडक्शन आमच्या टीमकडून झालेले नव्हते. तरीही आपण दिलगिरी व्यक्त करत असल्याचे एकताने म्हटले आहे.





