मोठी बातमी…! एकनाथ शिंदेंची राज ठाकरेंना युतीची ऑफर? शिंदेचा खास माणूस शिवतीर्थवर, तब्बल पाऊण तास खलबत

Raj Thackeray | उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू झाल्या. दोन्ही ठाकरे बंधुंकडून यावर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया समोर आल्या. ज्यावरून काहींनी टीका केली तर काही दोघांच्याही एकत्र येण्याच्या चर्चांचे स्वागत केले.
अशातच आता राज ठाकरे यांना शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी युतीचा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडून उद्धव ठाकरे कधी नव्हे ते युतीसाठी सकारात्मक असताना आता एकनाथ शिंदे यांच्याकडूनही युतीचा प्रस्ताव आल्याने राज ठाकरे यावर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याची चर्चा सुरु असतानाच मंगळवारी सकाळी शिवसेनेचे नेते उदय सामंत अचानक राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले.
यावेळी राज ठाकरे आणि उदय सामंत यांच्यामध्ये साधारण पाऊण तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती करण्याचा प्रस्ताव मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, उदय सामंत यांनी राज ठाकरे यांच्याशी राजकीय चर्चा झाल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. ‘मी सकाळी या भागात आलो होतो. त्यामुळे राज ठाकरे यांना फोन केला. तेव्हा त्यांनी मला चहा घेण्यासाठी घरी बोलावले. आमच्यात कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. मी केवळ चांगला चहा आणि खिचडी खाल्ली आणि निघालो, असं उदय सामंत म्हणाले.
पुढे म्हणाले, आमच्यात राजकारण सोडून इतर विषयांवर चर्चा झाली. मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत आमच्यात चर्चा झाली असती तर मी तसे सांगितले असते. राज ठाकरे आणि माझे संबंध हे राजकारणालीकडचे आहेत. त्यामुळे सगळ्याच भेटींकडे राजकीय दृष्टीकोनातून पाहणे योग्य नाही. आता इथून मी मुक्तागिरीवर एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी जाणार आहे. त्यामुळे मी आता राज ठाकरे यांचा संदेश घेऊन एकनाथ शिंदे यांच्याकडे जातोय, असा अर्थ काढू नका, असंही उदय सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.





