Eknath Shinde : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? धक्कादायक माहिती आली समोर
केंद्रातील राजकीय हालचालींचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या (Eknath Shinde) राजकारणावर होणार असून, येत्या काळात महाराष्ट्र पुन्हा एकदा देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde : आगामी काळातील देशाचे आणि राज्याचे राजकारण अनेक मोठ्या घडामोडींचे साक्षीदार ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. केंद्रातील राजकीय हालचालींचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या (Eknath Shinde) राजकारणावर होणार असून, येत्या काळात महाराष्ट्र पुन्हा एकदा देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे.
त्यातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. फडणवीस दिल्लीत गेल्यास महाराष्ट्राच्या सत्तेची धुरा कोणाकडे जाणार? भाजप राज्याची सूत्रे स्वतःकडे ठेवणार की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पुन्हा संधी मिळणार? या प्रश्नांनी राजकीय वातावरण तापवले असतानाच, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंबाबत मोठे भाकीत करून खळबळ उडवून दिली आहे.
बावनकुळे मुख्यमंत्री होणार
माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. राऊत म्हणाले, “येत्या काळात देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जाणार आहेत. इतकेच नव्हे तर ते २०२९ मध्ये देशाचे पंतप्रधानही होऊ शकतात. फडणवीस दिल्लीत गेल्यानंतर महाराष्ट्रातील सत्तेची सर्व सूत्रे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जातील आणि बावनकुळेच राज्याचे पुढील मुख्यमंत्री होतील.”
यावेळी त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्या नावाचाही उल्लेख केला. “गिरीश महाजन हे फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासातील नेते आहेत, परंतु त्यांची प्रतिमा मलिन झालेली असल्याने त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे जाण्याची शक्यता कमीच आहे,” असे सांगत राऊत यांनी एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, असा थेट दावा केला.
राऊतांची शिंदेंवर घणाघाती टीका
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर ‘आमदार-खासदार फोडल्याचा’ आरोप करत संजय राऊत यांनी पैशांच्या गैरव्यवहारावरून त्यांच्यावर कडक शब्दांत प्रहार केला. “शिंदे सध्या आमदार आणि खासदार फोडण्याचे काम करत आहेत. त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, पण हा पैसा काय त्यांच्या दरेगावातील शेतात उगवत नाही. हा पैसा ‘मिसिंग लिंक’च्या अडीच हजार कोटींचा आणि ओव्हर बजेटमधून लुटलेला पैसा आहे. अशा लुटलेल्या पैशांच्या जोरावर आमदार आणि खासदार विकत घेणे हेच त्यांचे धोरण आहे,” अशी टीका राऊत यांनी केली.
“आता फडणवीसांनी महालेखापालांना बघून घ्यावे…”
महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीवर बोट ठेवताना संजय राऊत यांनी कॅग (CAG) म्हणजेच महालेखापालांच्या ताज्या अहवालाचा हवाला दिला. “अशी माणसे केवळ राजकारणालाच नव्हे, तर देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि देशाला घातक आहेत. अर्थव्यवस्थेशी खेळ करणे हा एक प्रकारचा आर्थिक दहशतवाद आहे.
महालेखापालांनी आपल्या अहवालात महाराष्ट्राच्या आर्थिक बेशिस्तीवर अत्यंत कठोर शब्दांत कोरडे ओढले आहेत. अशीच आर्थिक बेशिस्त सुरू राहिली, तर भविष्यात महाराष्ट्राला कोणी एक रुपयाचेही कर्ज देणार नाही,” अशी भीती त्यांनी व्यक्त केली. हाच धागा पकडत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना उपरोधिक टोला लगावला.
“आता हे आम्ही किंवा विरोधी पक्षाने सांगितलेले नाही. महाराष्ट्राची बदनामी आम्ही केलेली नाही. हा अहवाल केंद्र सरकारच्या महालेखापालांनी दिला आहे. त्यामुळे जर त्यांनी महाराष्ट्राची बदनामी केली असेल, तर आता देवेंद्र फडणवीस यांनी महालेखापालांना बघून घेतले पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. ‘जरी ते सत्य असले तरी तुम्ही महाराष्ट्राविषयी असे कसे बोलू शकता?’ असा सवाल फडणवीसांनी त्यांना विचारला पाहिजे,” असा खोचक सल्लाही राऊत यांनी दिला.






